कोल्हापुरात पाच तास चालली संयुक्त बुधवार आणि रविवार पेठेची शिवजयंती मिरवणूक

By संदीप आडनाईक | Published: May 11, 2024 12:31 AM2024-05-11T00:31:49+5:302024-05-11T00:31:49+5:30

केरळ नृत्यप्रकार, रामप्रतिमा, शिवमूर्ती, ध्वनियंत्रणा आणि आकर्षक लेसर शो लक्षवेधी

The joint Wednesday and Sunday Shiv Jayanti procession of Pethe lasted for five hours in Kolhapur | कोल्हापुरात पाच तास चालली संयुक्त बुधवार आणि रविवार पेठेची शिवजयंती मिरवणूक

कोल्हापुरात पाच तास चालली संयुक्त बुधवार आणि रविवार पेठेची शिवजयंती मिरवणूक

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: ध्वनियंत्रणेच्या दणदणाटात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पापाची तिकटीपर्यंत संयुक्त जुना बुधवार पेठ आणि संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीने काढलेली शिवजयंतीची मिरवणूक तब्बल पाच तास सुरु होती. दोन्ही मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्ती, शिवरायांसह विविध मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, बालशिवाजी, पारंपरिक वेशभूषेतील तरुणतरुणी, आकर्षक विद्युत राेषणाई, लेसर शो, कर्णकर्कश्य ध्वनियंत्रणासोबत हलगी आणि लेझीम पथक, धनगरी ढोल आणि आतषबाजीचा समावेश होता.

संयुक्त जुना बुधवार पेठेच्या मिरवणुकीत रिक्षा आणि ट्रॅक्टर ट्रॉलीवर कोल्हापुरातील विविध समस्यांचे नामफलकाचे तर संयुक्त रविवार पेठेच्या मिरवणुकीतील केरळीयन मुखवटे आणि नृत्यशैलीतील कलाकारांनी लक्ष वेधून घेत होते. 

संयुक्त जुना बुधवार पेठ

संयुक्त जुना बुधवार पेठेतील मिरवणुकीला सायंकाळी ५ वाजता आतषबाजीने तोरस्कर चौकातून प्रारंभ झाला. यावेळी मालोजीराजे छत्रपती आणि पुष्पराज क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीची सुरुवात झाली. या मिरवणुकीत राज्य कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, ॲड. महादेव आडगुळे, संजय पवार, विजय देवणे सहभागी झाले होते. जुन्या बुधवार तालमीचा मर्दानी खेळाचा आखाडा सहभागी झाला होता. मिरवणुकीत ८० तरुण मंडळे आणि सहा तालमीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही मिरवणुक ताेरस्कर चौकातून जुना बुधवार पेठ तालीम, सीपीआर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, न्यू महाद्वार रोडवरुन पापाची तिकटी, कुंभार गल्ली, बुधवार पेठ या मार्गे निघाली. या मिरवणुकीत दीपक देसाई, नागेश घोरपडे, संदीप राणे, सुशिल भांदिगरे, महावीर पवार, दिगंबर फराकटे, शिवलिंग स्वामी, अनिल निकम, धनंजय सावंत, उदय भोसले, संदीप देसाई, ऋषिकेश भांदिगरे, अक्षय घाटगे, अतुल केपशेरी, सुशांत चौगुले, आकाश काळे, रमेश गवळी, अभिजित पाटील, भास्कर कदम उपस्थित होते.

संयुक्त रविवार पेठ

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती समितीच्या मिरवणुकीस बिंदूचौकातून सायंकाळी ५ वाजता प्रारंभ झाला. मालोजीराजे छत्रपती आणि पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. बिंदू चौकातून निघालेली ही मिरवणुक मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, न्यू महाद्वार, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौकातून बिंदू चौकात विसर्जित झाली. तब्बल पाच तास चाललेल्या या मिरवणुकीत परिसरातील ७० मंडळे आणि १० तालमीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीरामाचे डिजिटल भव्य कटआउट, केरळ नृत्यशैलीतील मुखवटे घातलेले कलाकार आणि आकर्षक विद्युत रोषणाई या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. याशिवाय बिंदू चौकात अफजल खान वधाचे ४० फुटी कटआउट उभारलेले होते.

महाद्वार रोडवर कर्णकर्कश ध्वनियंत्रणेसमाेर मिरवणुकीतील सहभागी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बेभान नृत्य केले. या मिरवणुकीचे आयोजन उत्सव समितीच्या रविंद्र पाटील, विनायक चंदुगडे, गजानन तोडकर, मिथुन काळे, राम कारंडे, सुनील यादव, ओमकार खराडे, स्वप्नील ठोंबरे यांनी केले.

संयुक्त राजारामपुरीच्या शिवजयंतीची सांगता

संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समितीच्या शिवजयंती सोहळ्याची गुरुवारी मिरवणुकीने सांगता झाली. लेसर शोसोबत ढोल पथक, हलगी वादन, मर्दानी खेळ, तोफा, शिवज्योत स्केटिंग रॅली, वीस घोड्यांवर स्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये लहान मुलांचा आणि मुलींचा सहभाग आणि आकर्षक आतषबाजीत ही मिरवणुक पार पडली. या मिरवणुकीचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या हस्ते झाले. मिरवणुकीत मालोजीराजे छत्रपती, राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, वसंतराव मुळीक, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, दशमिता सत्यजित जाधव आणि संयुक्त राजारामपुरी शिवजयंती संस्थापक सदस्य आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: The joint Wednesday and Sunday Shiv Jayanti procession of Pethe lasted for five hours in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.