पॅकेजिंग उद्योगाची ‘परफेक्ट’ बांधणी करणाऱ्या सुप्रिया, ७ वर्षांत चार पटीने वाढवली कंपनीची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 04:22 PM2022-10-10T16:22:56+5:302022-10-10T16:22:56+5:30
परदेशात करिअर घडविण्याचे ध्येय बाळगले असताना अचानकपणे त्यांचा ट्रॅक बदलला. लंडनहून त्या कोल्हापुरात परतल्या.
संतोष मिठारी
लंडनमधील विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेस विषयातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. अनुभवासाठी तेथील एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मनुष्यबळ विकास विभागातून सुरुवात करून अवघ्या काही महिन्यांत विक्री विभागाची जबाबदारी सांभाळली. पुढे परदेशात करिअर घडविण्याचे ध्येय बाळगले असताना अचानकपणे त्यांचा ट्रॅक बदलला. लंडनहून त्या कोल्हापुरात परतल्या. वडिलांनी सुरू केलेल्या इंडस्ट्रियल पॅकेजिंग कंपनीची धुरा त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी हाती घेतली. नवतंत्रज्ञान,कार्यपद्धतीतील बदलाच्या जोरावर त्यांनी गेल्या ७ वर्षांमध्ये कंपनीची उलाढाल चार पटीने वाढविली. उद्योगाची ‘परफेक्ट’ बांधणी करून युवा उद्योजिका सुप्रिया अशोक चौगुले यांनी घेतलेली भरारी प्रेरणादायी आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील परफेक्ट पॅकिंग इंडस्ट्रीच्या सीईओ असणाऱ्या सुप्रिया यांची शिक्षणानंतर करिअर क्षेत्रात येण्याचा प्रवास जरा हटके ठरला. कोल्हापुरातील उद्योग-व्यवसायाची परंपरा असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या सुप्रिया यांचे व्यवसाय करण्याचे ध्येय होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर मित्र-मैत्रिणींच्या प्रभावाने त्यांनी संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. मात्र, त्यात स्वारस्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. व्यावसायिक होण्याचे ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यावर अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात असताना त्यांनी व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणाची तयारी सुरू ठेवली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर लंडनमधील ग्रीनविच विद्यापीठात एमबीए साठी प्रवेश घेतला.
तेथील स्वतःचा खर्च भागविण्यासाठी शिक्षणाबरोबर त्यांनी एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम सुरू केले. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन या स्टोअर्सच्या व्यवस्थापनाने त्यांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविल्या. शिक्षण,अनुभवाच्या जोरावर परदेशातच व्यवसाय क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांनी ठरविले. पण,नियतीच्या मनात काही वेगळे होते. दोन बहिणींचा विवाह आणि वडिलांनी नवी पेपर मिलची सुरुवात केल्याने पॅकेजिंग कंपनीची जबाबदारी सुप्रिया यांनी सांभाळावी अशी इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली. कुटुंबाची गरज,व्यावसायिक होण्याचे ध्येय साध्य करण्याची उपलब्ध झालेली संधी लक्षात घेऊन त्यांनी या कंपनीची धुरा हाती घेतली.
त्यांनी सुरुवातीला कंपनीत पाश्चिमात्य कार्य संस्कृती लागू केली. पण,त्याला अपेक्षित यश आले नाही. मग,त्यांनी येथील लोकांची कार्यसंस्कृती,पद्धती समजून आणि त्याच्या जुळवून घेऊन काम सुरू केले. त्यांचा सकारात्मक परिणाम झाला आणि उलाढाल वाढली. आपल्याप्रमाणे इतर महिलांनाही उद्योगक्षेत्रात काम करण्याची समान संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने त्यांनी कंपनीतील महिला कामगारांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत नेली आहे. जागतिक पॅकेजिंग उद्योग क्षेत्रात कोल्हापूरची ओळख ठळक करण्यासाठी ‘एमएनसी’ कंपन्यांना उत्पादनाचा पुरवठा करणे. सर्व प्रकारच्या उद्योगांना संपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स देऊन सध्याच्या आमच्या सेमी ऑटोमॅटिक प्लांटचे संपूर्ण ऑटोमॅटिक प्लांटमध्ये रुपांतरित करणे आणि त्याचे काम पूर्णपणे महिला सांभाळतील असे त्यांचे ध्येय आहे.
उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट बनायचे हे ठरवून काम केले. महिलांना संधी दिली. कार्यपद्धती बदलली, नव तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याच्या जोरावर उद्योग भरारी घेतली. पक्का निर्धार,कष्टाच्या जोरावर कार्यरत राहिले,तर सर्वकाही शक्य आहे. ते लक्षात घेऊन युवती,महिलांनी कार्यरत व्हावे. - सुप्रिया चौगुले