Kolhapur- Keshavrao Bhosle Theatre Fire: आगीच्या कारणांबाबत 'संशयकल्लोळ'; महावितरणच्या खुलाशानंतर संशय बळावला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 11:44 AM2024-08-10T11:44:35+5:302024-08-10T11:45:07+5:30

कोल्हापूर : ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे नाही तर अन्य कोणत्या तरी कारणाने लागली ...

The Keshavrao Bhosle theater fire was not caused by a short circuit Suspicion increased after the disclosure of Mahavitran | Kolhapur- Keshavrao Bhosle Theatre Fire: आगीच्या कारणांबाबत 'संशयकल्लोळ'; महावितरणच्या खुलाशानंतर संशय बळावला

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे नाही तर अन्य कोणत्या तरी कारणाने लागली असावी, असा संशय इलेक्ट्रिकल विषयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी सकाळी काही तज्ज्ञांनी जेव्हा इलेक्ट्रिक कंट्रोल रूम, इन्व्हर्टर रूम, जनरेटर तसेच वायरिंगची पाहणी केल्यानंतर हा संशय बळावला आहे. 

मद्यपी, गांजा ओढणाऱ्यांचा कारभार असेल का?

नाट्यगृहाच्या मागील बाजूस खासबाग मैदानात जाण्यासाठी दोन्ही बाजूंस दोन मोठे दरवाजे आहेत. हे दरवाजे बंद असतात तेव्हा आत वाकून जाण्यासाठी दोन छोटे दरवाजेही आहेत. त्यातून कोणीही सहजपणे आत जाऊ शकते. मैदानासाठी जो रंगमंच करण्यात आला आहे तेथे कोणी मद्यपी रात्री बसले होते का? गांजा ओढणारे कोणी बसले होते का? याचीही चौकशी व्हायला पाहिजे. खासबागच्या मैदानावरील रंगमंचावर कुस्त्यांची मॅट ठेवण्यात आली होती. ती कोणाची होती? त्याला कोणी परवानगी दिली होती? या मॅटमुळे आग भडकली का? या प्रश्नांचाही शोध घ्यायला पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरे शाबूत असतील तरच यातील काही हाताला लागू शकेल.

  • नाट्यगृहाला खासबाग मैदानाकडील बाजूने आग लागली आणि ती पुढील बाजूला पसरत गेली. जेथून आग लागली व पसरली त्या नाट्यगृहाच्या मागील बाजूकडून नाट्यगृहाला वीजपुरवठा करण्यात आला आहे. त्यासाठी तेथे कंट्रोल पॅनेल रूम तयार केली आहे. दक्षिण बाजूला मोठा जनरेटर बसविण्यात आला आहे. तर उत्तर बाजूला इन्व्हर्टर पॅनेल बसविले आहे; परंतु या बाजूचे सर्व वायरिंग सुस्थितीत आहे. वायर कुठेही लूज अथवा जळाल्याचे दिसत नाहीत. जनरेटरसुद्धा सुस्थितीत आहे. इन्व्हर्टर रूममधील वायरिंग, तसेच चाळीस बॅटरींनाही काहीच झालेले नाही. त्यांना आगीच्या झळा देखील लागलेल्या नाहीत. त्यामुळेच इलेक्ट्रिकल तज्ज्ञांना ही आग शॉर्टसर्किटमुळे लागलेली नसावी असे वाटते.
  • नाट्यगृहात गेल्या तीन-चार दिवसांत एकही सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही. गुरुवारी तर काहीच कार्यक्रम नव्हता. त्यामुळे नाट्यगृहाचा मुख्य विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. वातानुकूलित यंत्रणा, नाट्यगृहातील दिवे सर्व काही बंद होते. त्यामुळे विद्युत भार अचानक वाढण्याचा, कमी होण्याचा, तसेच वायरिंगमुळे शॉर्टसर्किट होण्याचा प्रश्नच येत नाही, असे तज्ज्ञांना वाटते.
  • बऱ्याच वेळा आगीचे कारण ‘शॉर्टसर्किट’वर ढकलले जाते. तसे प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा संशय नाट्यगृहाच्या आगीबाबत गुरुवारी रात्री व्यक्त करण्यात येत होता; परंतु नेमके हेच कारण असेल असे आता वाटत नाही. अन्य कारणही असू शकते असा संशय घेण्यासारखी परिस्थिती आगीच्या घटनेनंतर पाहायला मिळत आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी तज्ज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली असून, ही समिती आगीचे कारण सांगू शकेल.
  • आगीनंतर आता फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट यांची जरूर चर्चा होईल; परंतु कालची आगही अशा कोणत्याही ऑडिटच्या कवेत मावणारी नव्हती. कारण ती लागली शाहू खासबागच्या बाजूला. तिकडे सागवाणी साहित्याचीच उभारणी जास्त असल्याने एकदा भडका उडाल्यावर नाट्यगृहाज जाऊन अग्निशमन यंत्रणा वापरणेच शक्य झाले नाही.


आगीशी महावितरणचा संबंध नाही

कोल्हापूर : येथील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संंबंध नाही, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकातून दिली. नाट्यगृहास आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यामुळे महाविरतणचे खुलासा करणारे पत्रक काढले आहे. पत्रकात म्हटले आहे की, नाट्यगृहास कोल्हापूर महापालिकेच्या नावाने महावितरणकडून उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. नाट्यगृहास वीजपुरवठा करणारी महावितरणची सीटी, पीटी, रोहित्र, मीटरिंग युनिट नाट्यगृहाच्या १०० मीटर लांब मोकळ्या जागेत आहे. महावितरणची जबाबदारी ही मीटरिंग युनिटपर्यंत असते. तेथून पुढे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्राहकाची असते. नाट्यगृहातील अंतर्गत वीज वितरण व्यवस्था ही महापालिकेकडून पाहिली जाते. सद्य:स्थितीत नाट्यगृहास वीजपुरवठा करणारी महावितरणची सर्व यंत्रणा सुस्थितीत आहे. त्यामुळे आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही.

शॉर्टसर्किट कधी होते?

  • जर वायरिंग लूज अथवा खराब असेल तर शॉर्टसर्किट होऊ शकते.
  • शॉर्टसर्किट झाल्यास ठिणग्या पडतात, तेव्हा पेट घेणाऱ्या वस्तूंवर ठिणग्या पडल्यास आग लागते.
  • वीजपुरवठ्याचा वर्कलाेड वाढल्यास किंवा कमी झाल्यास शॉर्टसर्किट होऊ शकते.

Web Title: The Keshavrao Bhosle theater fire was not caused by a short circuit Suspicion increased after the disclosure of Mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.