दगडफेकीतील ४०० संशयितांवर गुन्हे, ३६ अटकेत; कोल्हापूर बंदला लागले होते हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:34 AM2023-06-09T11:34:02+5:302023-06-09T11:34:15+5:30

शहर पूर्वपदावर, अपर पोलिस महासंचालकांकडून शहराची पाहणी

The Kolhapur bandh had taken a violent turn, Charges against 400 suspects in stone pelting; 36 arrested | दगडफेकीतील ४०० संशयितांवर गुन्हे, ३६ अटकेत; कोल्हापूर बंदला लागले होते हिंसक वळण

दगडफेकीतील ४०० संशयितांवर गुन्हे, ३६ अटकेत; कोल्हापूर बंदला लागले होते हिंसक वळण

googlenewsNext

कोल्हापूर : सोशल मीडियातील आक्षेपार्ह मेसेज आणि स्टेटसच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांनी बुधवारी (दि. ७) पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने शहरात दंगल उसळली. दगडफेक करून नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात ४०० संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी ३६ जणांना अटक केली. तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, गृह विभागातील कायदा सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी गुरुवारी (दि. ८) शहरातील दंगलग्रस्त परिसराची पाहणी केली.

शहरात ठिकठिकाणी दगडफेक करून दंगलखोरांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. विशिष्ट समाजाची घरे, दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करून एकूण सुमारे ४०० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जमावबंदीचे उल्लंघन करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जमावाला चिथावणी देणे अशा विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून पोलिसांनी ३६ संशयितांना अटक केली. सर्व संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

तोडफोडीच्या ३० तक्रारी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. दंगलीत सुमारे ३० रिक्षा, १० कार, ४० दुकाने, १८ दुचाकी, चिकनच्या दोन गाड्या, फळांच्या आठ हातगाड्या आणि एका चहाच्या गाडीचे सुमारे सहा लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. तक्रारींचा ओघ अजूनही सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. राज्याचे गृह विभागातील कायदा सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी गुरुवारी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अटकेतील संशयित

  • लक्ष्मीपुरी - १७
  • जुना राजवाडा - १६
  • शाहूपुरी - ३
  • अल्पवयीन ताब्यात - ३


१९ ते २५ वयोगटातील तरुणांचा तोडफोडीत समावेश

तोडफोडीच्या घटनांमध्ये बहुतांश तरुण १९ ते २५ वयोगटातील होते. अटकेतही याच वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. सर्व तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांचे शिक्षण १२ वी ते पदवीपर्यंत झाले आहे. अनेक तरुण बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरुणांचे नातेवाईक हवालदिल

अटकेतील तरुणांचे नातेवाईक गुरुवारी दिवसभर पोलिस ठाण्यांच्या बाहेर थांबून होते. आपल्या मुलाने दगडफेक केल्याचे त्यांना पटतच नव्हते. तरुणांना बुधवारी शिवाजी चौकात बोलवणाऱ्या नेत्यांपैकी एकही नेता गुरुवारी मुलांच्या जामिनासाठी प्रयत्न करताना दिसला नाही.

Web Title: The Kolhapur bandh had taken a violent turn, Charges against 400 suspects in stone pelting; 36 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.