vidhan sabha Election: 'उत्तर' पोटनिवडणुकीची आचारसंहिता शहरापुरतीच, 'हे' असणार नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:17 AM2022-03-14T11:17:12+5:302022-03-14T11:19:26+5:30
जिल्ह्यातील इतर ठिकाणी आचारसंहिता नसणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल आणि प्रचार करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागणार
कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आवश्यकता भासल्यास १२ एप्रिलला मतदान होईल. यासाठी शहरातील उत्तर मदारसंघापुरतीच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी आचारसंहिता नसणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल आणि प्रचार करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूलचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संतोष कणसे, रंजना बिचकर, अर्चना कापसे असतील. निवडणूक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असेल. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी येताना पाच जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
शनिवारी निवडणूक जाहीर होताच उत्तर मतदारसंघात मर्यादित आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघात राजकीय मेळावे, विकासकामांच्या उद्घाटनांना बंधने आली आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागणार आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकांचे मेळावे, रॅली, बैठकांना परवानगी घ्यावी लागेल.
निवडणूक लागली तर आचारसंहिता १८ एप्रिलपर्यंत राहणार आहे. मतदान केंद्रात येताना मतदारांनी मास्क लावून येणे अपेक्षित आहे. न आल्यास निवडणूक प्रशासनातर्फे संबंधित मतदारास मास्क देण्यात येणार आहे. मतदान केंद्रात थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून मतदारांना प्रवेश दिला जाईल. केंद्रात दोन डोस झालेल्या कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती असेल. मतदारांची सोय होण्यासाठी आवश्यकता भासल्यास मतदान केंद्राची संख्या वाढविण्यात येईल. मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्यात तपासणी करण्यात आली आहे.
मतदार होण्याची अजूनही संधी
१ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण झाली आहेत; पण त्यांनी मतदानासाठी नाव नोंदणी केलेली नाही, अशांना मतदार होऊन उत्तरसाठी मतदान करण्याची संधी अजूनही आहे. अर्ज केल्यानंतर पात्र असलेल्यांची नावे पुरवणी यादीत समावेश करण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.
खर्च मर्यादेत वाढ
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारास पूर्वी २५ लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. आता खर्चाची मर्यादा वाढवून ४० लाख रुपये करण्यात आली आहे, असेही उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी स्पष्ट केले.
एकूण मतदार : २ लाख ९१ हजार ५८३
पुरुष : १ लाख ४५ हजार ६५६
स्त्री : १ लाख ४५ हजार ९१५
तृतीयपंथी : १२
८० वर्षांवरील मतदार : ११,२७५
सर्व्हिस व्होटर : ९५
मतदान केंद्र : ३११
निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करणे : १७ मार्च
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ मार्च
अर्ज छाननी : २५ मार्च
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : २८ मार्च
मतदान : १२ एप्रिल
मतमोजणी : १६ एप्रिल