कोल्हापुरातील फाळकूटदादाची आधी रिल्समधून दहशत; पोलिसांचा प्रसाद मिळताच ‘इन्स्टा’ला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:07 PM2024-05-29T12:07:08+5:302024-05-29T12:07:28+5:30

टिंबर मार्केटमधील फाळकूटदादाचा रुबाब उतरवला, जुना राजवाडा पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

The Kolhapur police arrested a person who made provocative reels and went viral | कोल्हापुरातील फाळकूटदादाची आधी रिल्समधून दहशत; पोलिसांचा प्रसाद मिळताच ‘इन्स्टा’ला रामराम

कोल्हापुरातील फाळकूटदादाची आधी रिल्समधून दहशत; पोलिसांचा प्रसाद मिळताच ‘इन्स्टा’ला रामराम

कोल्हापूर : 'टप्प्यात आल्यावर नाही, तर टप्प्यात घेऊन आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो. आमच्याकडे बघून ताटणाऱ्यांचा पंचगंगा घाटावर खून करतो,' अशा चिथावणी देणाऱ्या रिल्स तयार करून त्या इन्स्टावरून व्हायरल करणारा फाळकूटदादा रोहित संजय जाधव (वय २०, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी अद्दल घडविली. पोलिसांचा प्रसाद मिळताच त्याने होत जोडून माफी मागत यापुढे वादग्रस्त रिल्स न करण्याची शपथ घेतली. कोल्हापूर सोडून जाणार असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

टिंबर मार्केट येथील रोहित जाधव या फाळकूट दादावर २०२२ मध्ये मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे. त्याचा मोठा भाऊ ओंकार जाधव याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. रोहित हा परिसरात भाईगिरी करीत असून, इन्स्टा अकाउंटवरून त्याने चिथावणीखोर व्हिडीओ व्हायरल केले आहेत. आर. जे. कंपनी या नावाने तो आणि त्याचे साथीदार व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल करीत होते. काही आक्षेपार्ह व्हिडीओ निदर्शनास येताच जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

गेल्या चार दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने मंगळवारी (दि. २८) त्याला घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने वादग्रस्त व्हिडीओ तयार केल्याची कबुली देऊन माफी मागितली. असे व्हिडीओ यापुढे करणार नसल्याचे आणि इन्स्टा अकाउंट बंद करणार असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या कारवाईनंतर तयार केलेल्या व्हिडीओत त्याने माफी मागत इतर तरुणांना भाईगिरीचे व्हिडीओ न करण्याचा सल्ला दिला.

माफीचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसांच्या कारवाईनंतर हात जोडून माफी मागितलेला व्हिडीओ त्याने स्वत:च्या इन्स्टा अकाउंटवर पोस्ट केला. त्यानंतर इन्स्टा अकाउंटला रामराम करत कोल्हापूर सोडून हुपरीला राहायला जाणार असल्याचे त्याने सांगितले. फळविक्रीचे काम करणाऱ्या आई, वडिलांना मदत करणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

रिल्सची हौस जिरणार

गुन्हेगारी टोळ्यांमधील गुंड, सराईत गुन्हेगारांसह अनेक अल्पवयीन मुले चिथावणीखोर, आक्षेपार्ह रिल्स तयार करून त्या व्हायरल करीत आहेत. यातून संघर्ष वाढून गुन्हे घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांकडून संशयितांना उचलून त्यांचे 'प्रबोधन' केले जात आहे. यातून अनेकांची रिल्सची हौस पक्की जिरणार आहे.

Web Title: The Kolhapur police arrested a person who made provocative reels and went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.