Kolhapur: पूरस्थितीत जीवदान देणारा रस्ताच केला बंद, रांगोळी ग्रामस्थ सापडले अडचणीत
By समीर देशपांडे | Published: June 20, 2024 03:22 PM2024-06-20T15:22:50+5:302024-06-20T15:24:37+5:30
कोल्हापूर : पुराच्या काळात गावातून बाहेर पडण्यासाठी असलेला पर्यायी जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ताच तारांचे कुंपण घालून बंद केल्याने रांगोळी ...
कोल्हापूर : पुराच्या काळात गावातून बाहेर पडण्यासाठी असलेला पर्यायी जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ताच तारांचे कुंपण घालून बंद केल्याने रांगोळी ता. हातकणंगले येथील ग्रामस्थांची कोंडी होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने तातडीने दखल घेत हा रस्ता खुला करावा अशी मागणी सरपंच संगीता नरदे यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
रेंदाळ येथील तिघांनी रांगोळी येथील ही जमीन खरेदी केली असून त्यानंतर या रस्त्यावर तारांचे कुंपण घातले आहे. वास्तविक हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून ग्रामस्थांच्या १०० वर्षे वहिवाटीचा आहे. महापुराच्या काळात अन्य रस्त्यांवर पाणी येत असल्याने गावाबाहेर पडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. असे असताना हाच रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
याबाबत हातकणंगले पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी तिघांना नोटीसा काढल्या आहेत. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून पावसाळ्याच्या तोंडावर या ग्रामस्थांच्या अडचणी प्रशासन कशा सोडवणार हे पाहणे महत्वाचे आहे.