दुर्दैवी! पंचगंगेतील एक सुळकी....सचिनचे आयुष्य संपवून गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:42 PM2022-05-26T12:42:48+5:302022-05-26T12:43:42+5:30

झाडावर चढून पंचगंगा नदीत मारलेली एक सुळकी त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त करून गेली.

The life of Sachin Patil who went for a swim was ruined | दुर्दैवी! पंचगंगेतील एक सुळकी....सचिनचे आयुष्य संपवून गेली

दुर्दैवी! पंचगंगेतील एक सुळकी....सचिनचे आयुष्य संपवून गेली

Next

युवराज कवाळे

कोल्हापूर : येथील बागल चौकातील तो अत्यंत उमदा तरुण. सामाजिक कार्यात पुढे असणारा.सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा..परंतु झाडावर चढून पंचगंगा नदीत मारलेली एक सुळकी त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त करून गेली. सचिन शिवाजी पाटील (वय ४०) याचे सोमवारी (दि. २३)निधन झाले. संपूर्ण बागल चौक, शाहूपुरी परिसरावर शोककळा पसरली.

घडले ते असे : मनमिळाऊ स्वभावाच्या सचिनला पोहण्याची खूप आवड होती. आठवड्यातून तीन-चारवेळा तो सकाळी पंचगंगा नदीमध्ये पोहण्यास जात असे. अनेकदा लहान भाच्यांनाही घेऊन तो जात असे. १८ मे रोजी तो नेहमीप्रमाणे पोहण्यास गेला. सचिन नदीच्या आंबेवाडीकडील बाजूस पोहण्यास गेला. जवळ असलेल्या झाडावर चढून पाण्यात सुळकी मारली. सुळकी मारल्यानंतर त्याचे डोके नदीच्या तळाशी असलेल्या भागावर जोरात आदळले आणि तो काही क्षणांतच पाण्यावर तरंगत वर आला.

शेजारी असलेल्या लोकांनी त्यास पाण्याबाहेर काढले व लगेचच खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर तो गंभीर असल्याचे सांगितले. तो बोलू शकत होता पाहू शकत होता पण गळ्यापासून खाली त्याच्या शरीराची हालचाल थांबली. शरीर निष्क्रिय झाले. हॉस्पिटलमध्ये त्यास भेटावयास येणाऱ्या प्रत्येकाला तो मी लवकर बरा होऊन येणार आहे, असे सांगत होता. सोमवारी सकाळपासून त्याचे बोलणे बंद झाले आणि दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. अविवाहित असलेल्या सचिन आईसोबत राहत होता. दोन बहिणी विवाहित आहेत.

सामाजिक कार्यात पुढे..

बागल चौक मंडळाच्या माध्यमातून तो अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर होता. तो याच मंडळाचा अध्यक्षही होता. गणेशोत्सव हा त्याचा खूप आवडता सण, यामध्ये गणेशोत्सव काळात कुंभार गल्लीत पुराचे पाणी आल्यावर तेथील गणपती बापट कॅम्प मध्ये नेऊन ठेवण्यासाठी तो आपल्या कुंभार मित्रांना मदत करत असे प्रत्येकाच्या सुख-दुःखात तो सहभागी असायचा त्याचा मित्रपरिवारही खूप मोठा आहे.

भावनिक शब्द....

सचिनचे मित्र बागल चौक मंडळाच्या मूर्तीचे कुंभार त्याला पाहण्यासाठी गेले असता तो त्यांना म्हणाला, अहो आपण आता पाऊस सुरू होण्याआधीच जर गणपती बापट कॅम्पला नेण्यास सुरुवात केली असती तर आज मी इथे नसतो. नदीला पोहण्यासाठी मला वेळच मिळाला नसता.


पाण्यात जोरात उडी मारल्यावर मेंदू व मणक्याला जोरात दणका बसू शकतो. त्यातून शरीराच्या मेंदूकडे व मेंदूकडून शरीराकडे जाणाऱ्या संवेदना थांबल्या जातात. रुग्णाला स्वत:चा श्वासही घेता येत नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. - डॉ. अनिल जाधव, न्यूरो सर्जन, कोल्हापूर

Web Title: The life of Sachin Patil who went for a swim was ruined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.