‘प्रोत्साहन’च्या अपात्र शेतकऱ्यांची यादी कारणासह येणार, पंधरा दिवसांत तिसरी यादी  

By राजाराम लोंढे | Published: January 5, 2023 12:22 PM2023-01-05T12:22:07+5:302023-01-05T12:22:40+5:30

तिसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांचा समावेश

The list of farmers ineligible for incentive subsidy will come with the reason, Third list in fifteen days | ‘प्रोत्साहन’च्या अपात्र शेतकऱ्यांची यादी कारणासह येणार, पंधरा दिवसांत तिसरी यादी  

संग्रहीत फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे वाटप एकीकडे सुरू असताना दुसऱ्या बाजूला ज्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तिसऱ्या यादीत सुमारे पाच हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर जे अपात्र ठरले आहेत, त्यांची नावे कारणासह जाहीर केली जाणार आहेत.

राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मुळात या याेजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अडीच वर्षे गेली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फेब्रुवारी २०२२ ला दहा हजार कोटीची तरतूद करण्यात आली. त्याची अंमलबजावणी सुरू होते, तोपर्यंत सरकार गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तातडीने पहिली यादी जाहीर केली. 

कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ३१८ पात्र शेतकऱ्यांचा समावेश पहिल्या यादीत होता. त्यातील बहुतांशी जणांच्या खात्यावर पैसेही वर्ग झाले. पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी तयार झाली तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने ती थांबविण्यात आली.

निवडणुकीनंतर ५७ हजार ३१० शेतकऱ्यांची दुसरी यादी आली आहे. येत्या पंधरा दिवसात तिसरी यादी येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांचा समावेश असेल.
जिल्ह्यातून २ लाख २५ हजार शेतकऱ्यांची माहीती पोर्टलद्वारे भरली होती. तिन्ही यादीत त्यातील सुमारे १ लाख ९० हजार शेतकरी पात्र तर उर्वरित सुमारे ३५ हजार शेतकरीही अपात्र ठरू शकतात. तिन्ही यादीत ज्यांची नावे आलेली नाहीत, त्यांची नावे अपात्रतेच्या कारणासह प्रसिद्ध केली जाणार आहेत.

राष्ट्रीयीकृत बँकांकडील लाभार्थी कमी

विकास संस्थांकडे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत अधिक असली तरी राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार खातेदारही कमी नाहीत. मात्र पहिल्या दोन यादीत १ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ ८ हजार ४०५ शेतकरी हे राष्ट्रीयीकृत बँकांचे आहेत. त्यामुळे या बँकांशी संबधित शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.

अपात्र ठरले तरी दाद मागता येणार

तिन्ही यादीत ज्यांची नावे आलेली नाहीत, त्या अपात्र शेतकऱ्यांना शासनाकडे दाद मागता येणार आहे. संबंधितांच्या अर्जावर शहानिशा होऊन त्यावर याेग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

दृष्टिक्षेपात ‘प्रोत्साहन’ अनुदान योजना 
सहभागी शेतकरी - २ लाख २५ हजार
पहिली यादीतील पात्र - १ लाख २९ हजार ३१८
दुसऱ्या यादीतील पात्र - ५७ हजार ३१०

Web Title: The list of farmers ineligible for incentive subsidy will come with the reason, Third list in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.