शेअर्स खरेदीने ८० टक्क्यापर्यंत फायद्याचे आमिष, कोल्हापुरात डॉक्टरला कोटीचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:49 PM2024-06-08T16:49:43+5:302024-06-08T16:50:31+5:30

कोल्हापूर : शेअर्स मार्केटमधील अमेरिकन नामांकित कंपनीच्या शेअर्स खरेदी विक्रीच्या नावाखाली न्यू महाद्वार रोडवरील डॉ. नितीन प्रभाकर देशपांडे यांची ...

The lure of profit up to 80 percent by buying shares, a doctor in Kolhapur was robbed of crores | शेअर्स खरेदीने ८० टक्क्यापर्यंत फायद्याचे आमिष, कोल्हापुरात डॉक्टरला कोटीचा गंडा

शेअर्स खरेदीने ८० टक्क्यापर्यंत फायद्याचे आमिष, कोल्हापुरात डॉक्टरला कोटीचा गंडा

कोल्हापूर : शेअर्स मार्केटमधील अमेरिकन नामांकित कंपनीच्या शेअर्स खरेदी विक्रीच्या नावाखाली न्यू महाद्वार रोडवरील डॉ. नितीन प्रभाकर देशपांडे यांची १ कोटी १० लाख ९४ हजार ४१८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी त्या कंपनीसह प्रोफेसर ध्रुव पारेख आणि लिंडा या महिलेवर गुन्हा दाखल केला. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याने जुना राजवाडा पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. देशपांडे यांना फेसबुक आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर बाजारातील मोठी अमेरिकन कंपनीची शेअर्स खरेदीची ऑनलाइन जाहिरात बघितली. त्यानंतर संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी झाले. या ग्रुपचे ॲडमिन प्रोफेसर ध्रुव पारेख आणि लिंडा नावाची महिला आहे. या दोघांनी कंपनीची जाहिरात करून शेअर्स खरेदी केल्यास २० ते ८० टक्के परतावा मिळेल, असे सांगितले. कंपनी नामांकित असल्याने गुंतवणूकीतून एक हजार टक्के फायदा मिळेल, अशा भूलथापा संशयितांनी मारल्या. 

त्यावेळी देशपांडे यांना शंका आल्याने त्यांनी कंपनीविषयी अधिक माहिती देण्यास सांगितले. लिंडा या महिलेने रजिस्टर स्टॉक ब्रोकर म्हणून या कंपनीचा नोंदणीकृत क्रमांक आयएनझेड ०००२४४४४३८ हा खोटा क्रमांक पाठविला. कंपनी नोंदणीकृत असल्याचा समज डॉ. देशपांडे यांचा झाल्याने त्यांनी ऑनलाइन व्यवहार करण्यास सुरुवात केली. त्यांनी दहा ते बारा टप्प्यात १ कोटी १० लाख ९४ हजार ४१८ रुपयांची रक्कम एनईएफटी आणि आयएमपीएसद्वारे १६ एप्रिल २०२४ ते १७ मे या कालावधीत वर्ग केली. त्यानंतर डॉ. देशपांडे यांना परतावा देण्यास संबंधितांनी टाळाटाळ केली. दिलेली रक्कम परत मागितली असता ती देण्यास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की तपास करत आहे.

सॉफ्टवेअरवर १४ कोटींची रक्कम

गुंतविलेल्या रकमेचा जादा परतावा म्हणून १ कोटी १० लाखांच्या बदल्यात सॉफ्टवेअरवर १४ कोटींची रक्कम झाल्याचे निदर्शनास आले. ऑनलाइन ग्रुपवरही मोठा परतावा मिळणार असल्याचे आमिष दाखविले गेले. मात्र परतावा मिळाला नसल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

शेकडो जणांच्या फसवणुकीची शक्यता

कंपनीचे अधिकृत कार्यालय मुंबईतील गोरेगाव येथे असल्याचे समजते. संबंधित प्रकरण मुंबई पोलिसांना कळविले आहे. अमेरिकन स्थित कंपनीच्या नावाखाली ऑनलाइन चोरट्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे समजते. फसवणुकीची ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे समजते.

Web Title: The lure of profit up to 80 percent by buying shares, a doctor in Kolhapur was robbed of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.