वारणा दरोडा प्रकरणाच्या तपासाचे पुढे काय झाले?; प्रमुख संशयिताचा खून, प्रकरण पुन्हा चर्चेत

By उद्धव गोडसे | Published: August 4, 2023 04:10 PM2023-08-04T16:10:41+5:302023-08-04T16:13:15+5:30

सीआयडीचा तपास ठप्प

The main suspect killed in the Warna robbery case,The matter is discussed again | वारणा दरोडा प्रकरणाच्या तपासाचे पुढे काय झाले?; प्रमुख संशयिताचा खून, प्रकरण पुन्हा चर्चेत

वारणा दरोडा प्रकरणाच्या तपासाचे पुढे काय झाले?; प्रमुख संशयिताचा खून, प्रकरण पुन्हा चर्चेत

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : मार्च २०१६ मध्ये वारणानगर येथील एका शिक्षण संस्थेच्या इमारतीमधून सुमारे नऊ कोटी १८ लाखांची रक्कम लंपास झाली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी सहायक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (रा. वासूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) याचा गुरुवारी (दि. ३) पहाटे वासूद येथे खून झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा वारणा दरोड्याचे प्रकरण चर्चेत आले असून, त्याच्या तपासाचे नेमके काय झाले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

या गुन्ह्यातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याचा आर्थिक कारणातून २९ जानेवारी २०२१ रोजी सांगलीत स्थानिक वादातून खून झाला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास जवळपास ठप्पच असल्याचे फिर्यादींनी सांगितले. 

काय आहे वारणा दरोडा प्रकरण?

मैनुद्दीन मुल्ला (रा. सांगली) हा काही दिवस वारणानगर येथील शिक्षण संस्थेत वाहनचालक म्हणून काम करीत होता. संस्थेच्या एका इमारतीत मोठी रक्कम असल्याची माहिती त्याला होती. त्याने रात्रीच्या वेळी काही रक्कम लंपास केली. त्यातून सांगलीतील दोन पोलिसांना महागड्या दुचाकी भेट दिल्या. हा प्रकार लक्षात येताच सांगली एलसीबीच्या पोलिसांनी मैनुद्दीन मुल्लाला घेऊन वारणानगरातील इमारतीची झडती घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवताच सांगली पोलिसांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला. कोल्हापूर पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुल्ला याच्यासह सांगली एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक आणि सात पोलिसांवर गुन्हा दाखल झाला.

तपासात काय झाले?

कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरुवातीचा तपास करून सांगली पोलिसांचे बिंग फोडले. संशयितांनी अनेक दिवस गुंगारा देऊन अटकेपासून पळ काढला. पुढे यातील संशयितांना अटक झाली. तत्कालीन पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी तपास करून सुमारे चार कोटींची रक्कम जप्त केली. जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर सीआयडीकडून झाला. पुढे सांगली सीआयडीकडे तपास वर्ग झाला. सध्या सांगली सीआयडीकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

चंदनशिवेचा सहभाग काय?

सांगली एलसीबीकडील सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे याने त्याच्या अन्य सहकाऱ्यांसोबत वारणानगरात जाऊन दोनदा मोठ्या रकमेवर डल्ला मारला. सांगली आणि कोल्हापुरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून हा प्रकार लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. अज्ञाताने त्याचा खून केला असून, गुरुवारी पहाटे त्याचा मृतदेह वासूद येथे आढळला.

Web Title: The main suspect killed in the Warna robbery case,The matter is discussed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.