रेंदाळ बँकेच्या व्यवस्थापकाचा दीड कोटींवर डल्ला, झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:58 PM2022-05-20T12:58:41+5:302022-05-20T12:59:06+5:30
त्यांने हा सर्व पैसा झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी विविध प्रकारच्या करन्सी, शेअर मार्केट व कर्नाटक सीमाभागातील गावांत जमीन खरेदी करण्यासाठी गुंतविल्याचे समजते.
हुपरी : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखा व्यवस्थापकाने बँकेच्या पैशांवर सुमारे दीड कोटी रुपयांवर डल्ला मारल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याच व्यवस्थापकाने बँकेबरोबरच अन्य काही खासगी लोकांकडूनही कोट्यवधी रुपये उकळले असल्याची चर्चा सुरू आहे.
त्यांने हा सर्व पैसा झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी विविध प्रकारच्या करन्सी, शेअर मार्केट व कर्नाटक सीमाभागातील गावांत जमीन खरेदी करण्यासाठी गुंतविल्याचे समजते. या घटनेमुळे बँकेच्या ठेवीदारांत खळबळ उडाली आहे.
या घटनेस बँकेचे अध्यक्ष अरुण महाजन यांनी दुजोरा दिला असून बँकेने संबंधित व्यवस्थापकाकडून आतापर्यंत ६० लाख रुपये घेतले आहेत असून उर्वरित रक्कमेच्या वसुलीसाठी त्या व्यवस्थापकाची संपत्ती कायदेशीर मार्गाने बँक ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत या व्यवस्थापकाने आपले नातेवाईक, मित्रमंडळी व सगेसोयरे यांच्या नांवे बोगस सोने तारण व कर्ज प्रकरणे दाखवून बँकेच्या सुमारे दीड कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार घडल्याचे समोर आला आहे. समाजातील सर्वसामान्य घटक व छोटे-छोटे यंत्रमागधारक व अन्य व्यावसायिकांचा आधारवड असणाऱ्या बँकेची या व्यवस्थापकाने मोठी फसवणूक केली आहे.
या बँकेने दोन वर्षापूर्वीच आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे. बँकेची इचलकरंजी शाखा उत्तम पद्धतीने सुरू असून बँकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सभासदाभिमुख कार्यामुळे या शाखेने अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केला. बँकेच्या या नावलौकिकास काळिमा फासण्याचे काम याच शाखेतील व्यवस्थापकाने केले आहे. असाच प्रकार गडहिंग्लजमधील एका नावाजलेल्या बँकेतही गेल्यावर्षी उघडकीस आला आहे.