काळा दिन: सीमाभागातील मराठी बांधवांनी निर्णायक लढ्यासाठी तयार रहावे, प्रा अच्युत मानेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 03:47 PM2022-11-01T15:47:49+5:302022-11-01T15:48:09+5:30
लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला कर्नाटक पोलीस मात्र दडपशाहीची भूमिका घेत आहेत.
निपाणी : गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळापासून सीमाभागातील मराठी भाषिक अन्याय सहन करत आहे. लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला कर्नाटक पोलीस मात्र दडपशाहीची भूमिका घेत आहेत. यामुळे आता सीमाभागातील मराठी भाषिकांनी निर्णायक लढ्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या पुढचा लढा हा अधिक सक्षमपणे लढण्यात यावा यासाठी मराठी भाषिकांनी व नवीन पिढीने यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अच्युत माने यांनी केले.
निपाणी भाग मराठीकरण समिती, शिवसेना. म ए युवा समिती व समस्त मराठी भाषकांच्यावतीने निपाणी येथे काळा दिनानिमित्त निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म ए समितीचे जयराम मिरजकर, प्रा एन आय खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, युवा समिती कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, प्रा भारत पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
माने पुढे म्हणाले की, सीमाप्रश्नाचा हा लढा सर्वाधिक जुना व कायदेशीर व न्यायालयीन मार्गाने लढला जात आहे. या साठ वर्षाच्या काळात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात केली जाते. यापलीकडे सीमा वासियांसाठी काही केले जात नाही. आज निपाणी पोलीस प्रशासन मराठी भाषिकांवर दडपशाही करत आहे. यापूर्वी रस्त्यावरील लढाईला परवानगी होती. आता बंद दाराआड चळवळीची सभा घेतली जात आहे. रस्त्यावर उतरला तर अटक करू अशा धमक्या हे प्रशासन देत आहे. यामुळे आता मराठी भाषिकांनी याचा विचार करून संघर्ष केला पाहिजे.
जयराम मिरजकर म्हणाले की, भाषावर प्रांत रचना होताना बहुसंख्य मराठी भाषिक असलेला हा भाग मात्र कर्नाटकात डांबण्यात आला. पण आता न्यायालयाच्या अंतिम प्रक्रियेत हा प्रश्न असल्याने लवकरच हा प्रश्न सुटणार आहे. निपाणी येथील प्रशासन व्यापारी व मराठी भाषिकांवर दबाव आणत आहे. हे प्रशासनाने न करता आमचा आंदोलन करण्याचा घटनेने दिलेला हक्क येथील मराठी भाषिकांना द्यायला पाहिजे.
बाबासाहेब खांबे म्हणाले की, एक नोव्हेंबर रोजी परंपरेने काळा दिन पाळून रस्त्यावर आंदोलन करण्याची आमची तयारी होती पण पोलीस प्रशासनाने आदल्या दिवशी उशिरा रात्रीपर्यंत आम्हाला परवानगी नाकारली. रस्त्यावर उतरला तर अटक करू अशी धमकी दिली व त्याचबरोबर वारंवार विनंती केल्यानंतर बंद दाराआड निषेध करण्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नवनाथ चव्हाण, स्वरूप परीट, नंदकुमार कांबळे, बाबासाहेब मगदूम, प्रकाश इंगवले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.
रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे...
या कार्यक्रमात रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे... निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.