कोल्हापुरातील वैष्णवीच्या खुनाचा सूत्रधार देवठाणेतील मठाचा महाराजच..?, गुन्हा दाखल होताच गायब
By उद्धव गोडसे | Published: April 12, 2024 01:12 PM2024-04-12T13:12:58+5:302024-04-12T13:14:02+5:30
सेवकांकडून बनवाबनवीचा प्रयत्न
उद्धव गोडसे
कोल्हापूर : देवठाणे (ता. पन्हाळा) येथील मठात अमानुष मारहाणीत मृत्यू झालेल्या वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) हिच्या खुनामागे मठाचा प्रमुख बाळकृष्ण महाराज हाच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मृत वैष्णवीची आई शुभांगी आणि अटकेतील दोन सेवकांनीही पोलिसांची दिशाभूल केल्याने संशयाची सुई महाराजाकडे वळली आहे. त्याच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवठाणे येथे १७ वर्षांपूर्वी निसर्गरम्य वातावरणात श्री नृसिंह समर्थ ज्ञान मंदिर मठाची स्थापना झाली. सध्या मठाचा कारभार पाहणारा बाळकृष्ण महाराज याच्या वडिलांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांकडे जागेची मागणी केली. त्यानंतर ग्रामस्थ आणि काही भाविकांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने मठाची उभारणी झाली. याच मठाची जबाबदारी सांभाळणारा बाळकृष्ण महाराज आणि मठाच्या सेवेत वैष्णवी पोवार कार्यरत होती.
गेल्या वर्षभरापासून ती महाराजासोबत वावरत होती. महाराजाची खासगी मदतनिस अशीच तिची भूमिका होती. काही दिवसांपूर्वी घरी आलेली वैष्णवी रंगपंचमीनंतर पुन्हा पुणे येथे महाराजांकडे गेली होती. महाराजानीच तिच्या आईला आणि मठातील सेवेकरी संतोष आडसुळे यांना पुण्याला बोलवून घेतले होते. तिथेच त्यांनी वैष्णवीला मारहाण करण्याचा सल्ला सेवेकऱ्यांना दिला होता. त्याच्या सांगण्यावरूनच सेवेकऱ्यांनी देवठाणे येथील मठात नेऊन तिला बेदम मारहाण केली.
मारहाणीपर्यंत सतत सेवेकऱ्यांच्या संपर्कात असलेला महाराज त्यानंतर मात्र गायब झाला आहे. वैष्णवीचा मोबाइलही अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. तो मोबाइल सेवेकऱ्यांनी गायब केला असावा किंवा महाराजांकडेच असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. वैष्णवीची आई आणि भाऊ यांच्यासमोर तिचे हातपाय बांधून अमानुष मारहाण झाली. मात्र, त्यांच्या माहितीत विसंगती येत आहे. अटकेतील सर्वच सेवेकरी महाराजाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून, संशयित बाळकृष्ण महाराजाच्या अटकेनंतर तिच्या खुनाचे खरे कारण समोर येणार आहे. ते कारण धक्कादायक असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
देवठाणेत कुजबुज
१७०० ते १८०० लोकवस्तीच्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावात महाराजाबद्दल उघडपणे बोलण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. मात्र, त्याच्या वर्तनाबद्दल दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा आहेत. मठाच्या भक्त मंडळातील काही सेवेकरी नियमित महाराजांच्या संपर्कात असतात. त्यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांची दिशाभूल केली
वैष्णवीची आई आणि सेवेकरी सुरुवातीपासूनच तपासात पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. वैष्णवी आधीच पुण्यात महाराजासोबत होती, तरीही तिला कोल्हापुरातून घेऊन गेल्याचे त्यांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितले होते. तिच्या मोबाइलबद्दलही चुकीची माहिती दिली. अजूनही त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.