कोल्हापूर जिल्ह्याचा पारा १८ डिग्रीपर्यंत, थंडी वाढली; ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 02:23 PM2024-11-12T14:23:07+5:302024-11-12T14:24:32+5:30
जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता
कोल्हापूर : जिल्ह्याचा पारा घसरला असून, सोमवारी तो १८ डिग्रीपर्यंत खाली आल्याने थंडी वाढली आहे. पहाटेपासूनच अंगाला झोंबणारे वारे वाहत असल्याने नऊपर्यंत अंगातून थंडी जात नाही. आगामी दोन दिवस असेच वातावरण राहणार असून, गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
नोव्हेंबर उजाडला तरी यंदा थंडी जाणवली नाही. ढगाळ वातावरणासह पाऊस राहिला. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात आता हळूहळू थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळी अंगात हुडहुडी भरली होती. दिवसभर उष्मा असतो, कमाल तापमान ३० डिग्रीपर्यंत जात असल्याने ऊनही खूप लागते. मात्र, सायंकाळ नंतर वातावरणात गारवा जाणवतो. रात्री दहानंतर थंडी वाढत आहे.
आज, मंगळवारी किमान तापमान १७ डिग्रीपर्यंत येणार असले, तरी कमाल तापमान ३२ डिग्रीपर्यंत राहणार आहे. गुरुवार, शुक्रवार व शनिवार जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप सुरू झाला नसल्याने शिवारातील शेकोट्या यंदा थंडच आहेत. मात्र, गल्लीमध्ये सकाळी व रात्री लहान मुले व वयोवृद्ध मंडळी शेकोटी भोवती बसलेले दिसतात.