सत्तारुढच मंत्रालयावरून उड्या मारतात ही सरकारची लायकी, नाना पटोले यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 06:15 PM2024-10-05T18:15:19+5:302024-10-05T18:16:27+5:30
राज्यात सत्ता परिवर्तन अटळ
कोल्हापूर : सत्ता पक्षाचे आमदार मंत्रालयावरून उड्या मारून बंड पुकारत असतील तर या सरकारची लायकी काय आहे हेही स्पष्ट होते, अशी बोचरी टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. महायुती सरकारने राज्यात अनेक चुकीचे निर्णय घेऊन महाराष्ट्राचा लिलाव काढला असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
पटोले म्हणाले, आपण पुन्हा सत्तेत येत नाही, याची जाणीव झाल्यामुळे महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राचा लिलाव करण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. लोकहितापेक्षा स्वत:च्या हिताचे निर्णय घेण्याचा महायुती सरकारने धडका लावला आहे. परंतु, सत्ता परिवर्तनानंतर आमच्या सरकारला महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. राज्यातील सत्ता परिवर्तन अटळ आहे. राज्यातील सरकार दिवाळखोर आहे. विविध योजना, कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी तीस हजार कोटींचे ओव्हरड्राफ्ट घेतले आहेत. हेच एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारचे यश असल्याचे सिद्ध होत आहे.
महाराष्ट्र सुरक्षित नाही..
आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत. या भूमीने देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समतेचा विचार दिला. महिलांचा सन्मान, सगळ्या जातीधर्मांना सोबत घेऊन चालण्याचा संदेश याच भूमीने दिला. पण आज महाराष्ट्रात समता राहिली नाही. महिला तर कुठेही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. असे एक शहर नाही, गाव नाही जिथे आमची लहान मुलगी सुरक्षित आहे. आम्ही सरकारला राज्यातील १०६४ महिला बेपत्ता आहेत त्यांचे काय झाले असे विचारले? त्यावर अद्याप उत्तर दिले नाही, असे पटोले यांनी सांगितले.