वीज बिल थकल्याचा मेसेज अन् बँक खात्यातील पावणेबारा लाख लंपास; कोल्हापुरातील वृद्धाला ऑनलाइन गंडा
By उद्धव गोडसे | Published: October 21, 2023 12:44 PM2023-10-21T12:44:13+5:302023-10-21T12:52:28+5:30
कोल्हापूर : 'तुमचे वीज बिल थकले असून, आज रात्रीपासून वीज पुरवठा खंडित होईल,' असा मेसेज पाठवून अज्ञाताने विलास मारुती ...
कोल्हापूर : 'तुमचे वीज बिल थकले असून, आज रात्रीपासून वीज पुरवठा खंडित होईल,' असा मेसेज पाठवून अज्ञाताने विलास मारुती पाटील (वय ७९, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) यांना ११ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १० ते २० ऑक्टोबर दरम्यान घडला. याबाबत पाटील यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयिताचा शोध सुरू आहे.
पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. 'तुमचे वीज बिल थकले असून, आज रात्री पावणेअकरापासून तुमचा वीज पुरवठा खंडित होईल. बिल भरण्यासाठी महावितरणच्या कार्यालयास संपर्क साधा,' असा तो मेसेज होता. त्यानंतर काही वेळाने दुसरा मेसेज आला. 'वीज बिल भरण्यासाठी पुढील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधा.' वीज पुरवठा बंद होऊ नये यासाठी पाटील यांनी ऑनलाइन बिल भरण्याचा विचार केला.
त्यानुसार मेसेजमधील नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपला एक अर्ज पाठवण्यात आला. माहिती भरून घेताना संशयितांनी त्यांच्या बँक खात्यांचा तपशील मिळवला. त्यानंतर संशयिताने मोबाइलवरून बिलाची रक्कम वर्ग करण्यास सांगितले. त्याचवेळी पाटील यांच्या खात्यातील ११ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम वजा झाल्याचा मेसेज आला. बँकेत जाऊन खात्यातील रक्कम तपासल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.