संविधान मसुदा समितीचे इतिवृत्त मराठीत वाचायला मिळणार, कोल्हापुरात पुनर्मुद्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:10 PM2022-03-25T12:10:37+5:302022-03-25T16:46:20+5:30

समितीचे सदस्य सचिव प्रदीप आगलावे यांनी भाषांतरित केलेल्या या खंडाचे येत्या एप्रिलला आंबेडकर जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होत आहे.

The minutes of the Constitution Drafting Committee will be read in Marathi, reprinted in Kolhapur | संविधान मसुदा समितीचे इतिवृत्त मराठीत वाचायला मिळणार, कोल्हापुरात पुनर्मुद्रण

संविधान मसुदा समितीचे इतिवृत्त मराठीत वाचायला मिळणार, कोल्हापुरात पुनर्मुद्रण

googlenewsNext

नसिम सनदी

कोल्हापूर : घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी लिहिलेल्या संविधान सभेचा इतिवृत्तांत आता मराठीतून वाचायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे हे इतिवृत्त सांगणारा १३ वा खंड कोल्हापुरात पुनर्मुद्रित झाला आहे. समितीचे सदस्य सचिव प्रदीप आगलावे यांनी भाषांतरित केलेल्या या खंडाचे येत्या एप्रिलला आंबेडकर जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होत आहे.

भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त केली होती, त्याचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधान सभेमध्ये घटनेचा मसुदा सादर केल्यानंतर त्यावर उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नावर स्वतः आंबेडकर यांनी समर्पक उत्तरे दिली होती. या प्रश्नोत्तरासह त्यावेळी झालेल्या चर्चा यांचा स्वतः आंबेडकर यांनीच इतिवृत्तांत लिहून काढला. त्यांनी लिहिलेल्या २४ खंडांपैकी हा इतिवृत्तांताचा १३ वा खंड होता. हे सर्व लेखन इंग्रजीमध्ये असल्याने त्या तीव्रतेने आणि वेगाने जनतेपर्यंत पोहोचले नाही.

अभ्यासक आणि नव्या पिढीपर्यंत घटना तयार करण्यामागचे कष्ट पोहोचणे अपेक्षित होते; पण भाषेच्या अडचणीमुळे ते पोहोचू शकले नाही. ही खंत आणि अडचण लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आंबेडकर यांचे सर्व साहित्य मराठीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

शिक्षणमंत्री अध्यक्ष असलेल्या या समितीमध्ये २७ सदस्य नियुक्त केले. आता या समितीवर नागपूरचे प्रदीप आगलावे हे सदस्य सचिव आहेत. जून २०२१ ला कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी या कामात वाहूनच घेतले आहे. पावणेदोन वर्षांच्या काळात पूर्ण वेळ काम करत तब्बल सहा खंड अनुवादित करून पुनर्मुद्रित करण्याचे काम पूर्णत्वास नेले आहे.

गुरुवारी ते शासकीय ग्रंथालयात सुरू असलेल्या खंड निर्मितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांची भेट घेतली असता त्यांनी आतापर्यंतच्या खंड निर्मितीच्या कामाचा लेखाजोखा मांडला. पुनर्मुद्रण, भाषांतर आणि अप्रकाशित साहित्य उजेडात आणणे, हे तीन उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रंथ अत्यल्प किमतीत मिळणार

आंबेडकर यांचे प्रकाशित आणि अप्रकाशित असे दोन प्रकारचे लेखन आहे. ते सर्व इंग्रजीमध्ये आहे. त्याचे मराठीकरण केले जात आहे. आंबेडकर विचार कार्य पुस्तक रुपाने अतिशय कमी किमतीत घरोघरी आणि अभ्यासक यांच्यापर्यंत पोहोचावेत, ही चरित्र साधन प्रकाशन समिती स्थापन्यामागचा उद्देश आहे आणि राज्य सरकारने सर्व प्रकारचे पाठबळ देऊन तो उद्देशही साध्य केला आहे.

चळवळीचा इतिहास पुस्तकबध्द होणार

  • डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील १९३० ते १९५६ हा चळवळीचा काळ. या काळात त्यांनी सुरू केलेले जनता हे वृत्तपत्र या सर्व वाटचालीचा साक्षीदार आहे.
  • डॉ. आंबेडकर समजून घेण्यासाठी हा इतिहास पुस्तकबद्ध होणे गरजेचे होते. साधारपणे २४ खंड निघतील इतका हा इतिहास विस्तृत आहे.
  • याचा पहिला खंड तयार झाला आहे, तोदेखील या जयंतीला प्रकाशित होणार आहे. महाडचा सत्याग्रह, त्याचे न्यायालयीन खटले, प्रबुद्ध भारत अंक यांचा अमूल्य ठेवा या खंडात आहे.


लंडनमधील लेखनावर प्रकाश

आंबेडकर हे लंडनमध्ये शिकत असताना त्यांनी तिथे काही लेखन करून ठेवले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये तसे काही लेखन आढळून आले. आता त्या लेखनाचेही भाषांतर करण्याचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे समग्र साहित्य, त्यांचे विचार अभ्यासूंना उपलब्ध होणार असल्याचेही प्रदीप आगलावे यांनी सांगितले.

Web Title: The minutes of the Constitution Drafting Committee will be read in Marathi, reprinted in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.