Kolhapur: केशवराव भोसले नाट्यगृह आगीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, एफआयआर का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:58 AM2024-08-16T11:58:33+5:302024-08-16T11:58:59+5:30
कृती समितीने प्रशासनाचा खोटारडेपणा केला उघड
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची एफआयआरच महापालिकेने केलेला नाही. जळीत नोंद म्हणून पोलिसात नोंद करून एफआयआर झाल्याचे प्रशासन खोटे सांगत आहे. प्रशासनाचा हा खोटारडेपणा बुधवारी नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर उघड केला. बैठकीत प्रशासनास एफआयआरची प्रत समिती सदस्यांना दाखवता आली नाही. म्हणून समितीचे सदस्य बाबा इंदूलकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या वास्तू मिटवण्यासाठी हे प्रकरण दाबले जात आहे. वरिष्ठांच्या दबावामुळेच एफआयआर होत नाही, असा आरोप केला.
महापालिकेत शिष्टमंडळाने प्रशासक मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी इंदूलकर म्हणाले, आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नाही, असे महावितरणाचे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ कोणी तरी लावली आहे किंवा अन्य कोणती तरी घटना घडून लागली आहे. याचा पारदर्शक तपास होण्यासाठी पोलिसात एफआयआर होणे बंधनकारक आहे. विम्याची रक्कम मिळण्यासाठीही एफआयआर सक्तीचे आहे, तरीही महापालिका एफआयआर दाखल करीत नाही. हे मोठे षडयंत्र आहे.
आर. के. पोवार म्हणाले, नाट्यगृहाच्या आगीत कोणाचा हात आहे याचा शोध लागला पाहिजे. आगीची घटना घडून सात दिवस झाले अजून कारण अस्पष्ट आहे. असे का ? यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, बाबा पार्टे, अनिल घाटगे, मिलिंद अष्टेकर आदी उपस्थित होते.
फायर ऑडिट प्रमाणपत्र बोगस, खोटा
१ जानेवारी ते ३० जून २०२४ अखेरपर्यंतच्या कालावधीत नाट्यगृहाचे फायर ऑडिट झाल्याचे प्रमाणपत्र वर्धा फायर ॲन्ड सेफ्टी सर्व्हिसेसने १४ जून २०२४ रोजी दिले आहे. ३० जूनअखेरपर्यंतच्या फायर ऑडिटचे प्रमाणपत्र १४ जूनला कसे दिले ? हे पत्रच बोगस आणि खोटे आहे, असा गंभीर आरोप ॲड. इंदूलकर यांनी पुराव्यानिशी केला. यावर प्रशासन निरुत्तर झाले. नियमानुसार मॉक ड्रील घेऊन नाट्यगृहाचे फायर ऑडिट झालेले नाही. नाट्यगृह जळाल्यानंतर महापालिकेने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
..तर माझ्यावर गुन्हा दाखल करा
महापालिका आगीचे जळीत नोंद पोलिसांकडे केली आहे. घटना घडून सात दिवस होऊनही गेले तरी अजूनही एफआयआर नोंद झालेला नाही. हे माझे जर खोटे असेल तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, नाही तर नोंद झालेली असेल तर एफआयआरची प्रत द्या, असे थेट आव्हान दिलीप देसाई यांनी प्रशासक मंजूलक्ष्मी यांना दिले. यावर प्रशासक मंजूलक्ष्मी यांनीही शेवटपर्यंत एफआयआर दाखल झाल्याचे मलाही ब्रीफींग केले आहे, इतकेच सांगितले.
खाऊ गल्लीला परवानगी देऊ नये..
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमगर म्हणाले, खाऊ गल्लीमुळे नाट्यगृहाची आग विझविताना अनेक अडथळे आले. खाऊ गल्लीत उघड्यावर सिलिंडर ठेवले जातात. ते धोकादायक आहे. जवळच देवल क्लबची इमारत आहे. म्हणून खाऊ गल्लीला परवानगी देऊ नये.