Kolhapur: वाईट नजरेने पाहतो म्हणून कामावरून काढला, ट्रॅक्टरचालकाने रागाने मालकाच्या पत्नीचा खून केला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 02:14 PM2023-10-27T14:14:04+5:302023-10-27T14:15:24+5:30
संशयितानेच दिला खुनाचा निरोप
पेठवडगाव / नवे पारगाव : घुणकी (ता. हातकणंगले) येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या बेपत्ता महिलेचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. ट्रॅक्टरचालकाने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून ट्रॅक्टरमालकाच्या पत्नीचा गळा आवळून अमानुष खून केला. सुषमा अशोक सनदे जाधव (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत पती अशोक विष्णू सनदे यांनी तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुनील गणपती जाधव (रा. घुणकी) याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, घुणकी येथील सनदे दाम्पत्य हे शेती करतात. सनदे यांचे दोन ट्रॅक्टर आहेत, तर त्यांची पत्नी सुषमा सनदे कुटुंबास मदतीसाठी घरातील जनावरे चरायला घेऊन जात होत्या. नेहमीप्रमाणे सुनीता या गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावच्या उत्तरेस वारणा नदीच्या बाजूला असलेल्या सुधीर आप्पासाहेब मगदुम यांच्या ‘डाग’ नावाच्या शेताजवळ जनावरे चरावयास घेऊन गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला. दरम्यान, आज शुक्रवारी (दि. २७) सकाळी सुषमा यांचा मृतदेह सुधीर अण्णासाहेब मगदूम यांच्या उसाच्या शेतात आढळला.
वडगावचे पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शेतात मृतदेह असल्याने रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, अशोक विष्णू सनदे यांचा ट्रॅक्टर असून, दोन वर्षांपूर्वी आरोपी सुनील गणपती जाधव हा सनदे यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. तो सुषमा यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागल्याने त्याला कामावरून काढून टाकले होते. तेव्हापासून त्याच्या मनात राग होता. त्या रागापोटी सुनीलने सुषमा यांचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दुपारी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू असा परिवार आहे. रात्री सुषमा यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संशयितानेच दिला खुनाचा निरोप
यातील मुख्य संशयित सुनील जाधव याने सुषमा यांचा मुलगा व वडील यांना फोन करून सुषमा हिला संपवल्याचा निरोप दिला होता. त्यानंतर काल रात्रीपासून त्यांचा व जनावरांचा शोध घेण्यात येत होता. सकाळी बेपत्ता जनावरे सापडल्यानंतर उसाच्या सरीत मृतदेह मिळून आला.