Kolhapur: ठरवून केला गुंड अजय शिंदे याचा गेम; खुनाच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:03 PM2024-04-05T12:03:50+5:302024-04-05T12:04:09+5:30
हद्दपारीचा प्रस्ताव लटकला, यादवनगरातील गँगवॉर तीव्र
कोल्हापूर : गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अजय दगडू शिंदे ऊर्फ रावण याच्यावरील हद्दपारीचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिसांनी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्याला मंजुरी मिळण्यापूर्वीच विरोधी टोळीने ठरवून त्याचा गेम केला. अजय शिंदे याला फोन करून बोलवून घेतलेली विरोधी आधीच शस्त्रांसह रंकाळा चौपाटीवर पोहोचली होती, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. पोलिसांनी सहा ते सात हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली असून, त्याच्या अटकेसाठी पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, खुनाच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.
सराईत गुन्हेगार अजय शिंदे ऊर्फ रावण याची यादवनगरात दहशत वाढली होती. त्याचे वाढते प्रस्थ विरोधी टोळीच्या डोळ्यात खुपत होते. त्यामुळे दोन गटांत वारंवार किरकोळ कारणांवरून वादाचे प्रसंग घडत होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दगडफेकीचे निमित्त झाले आणि रोहित शिंदे, अक्षय माळी, सचिन माळी, राहुल शिंदे, अर्जुन शिंदे यांनी अजय शिंदे याचा गेम करायचे ठरवले.
त्यानुसार गुरुवारी दुपारी त्याला रंकाळा चौपाटीवर बोलावले. तो येण्यापूर्वीच एक कार आणि दोन दुचाकींवरून शस्त्रसज्ज हल्लेखोर चौपाटीवर पोहोचले. वाद मिटवण्याचे केवळ निमित्त होते. बोलता बोलता त्याच्यावर धारदार शस्त्रांनी २० ते २५ वार करून हल्लेखोर पळाले. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या थरारक घटनेने रंकाळ्यावर दहशत निर्माण झाली. हल्लेखोरांमध्येही काही सराईत गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इन्स्टा अकाउंट - रावण १३२७
मृत अजय शिंदे याचे इन्स्टावर रावण १३२७ या नावाने अकाउंट आहे. त्यावर विरोधी टोळ्यांना चिथावणी देणारे अनेक व्हिडीओ त्याने शेअर केले आहेत. स्वत:ला तो परिसरातील दादा समजत होता.
हद्दपारीचा प्रस्ताव लटकला
सराईत गुन्हेगार अजय शिंदे याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिसांनी करवीर प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला होता. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांतच त्याच्या हद्दपारीला मंजुरी मिळाली असती तर कदाचित खुनाची घटना टळली असती. जिल्ह्यातील सुमारे ६० गुन्हेगारांवरील हद्दपारीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावर तातडीने अंमलबजावणी होण्याची गरज पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल
खुनाच्या घटनेनंतर काही वेळातच हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यात खाली पडलेल्या शिंदे याच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर एडक्याने वार करत असलेले काही तरुण दिसत आहेत. हल्लेखोरांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.