छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास समोर आणल्यानेच जॅक्शनचा खून, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:18 PM2023-06-01T16:18:41+5:302023-06-01T16:20:19+5:30
वेदोक्त प्रकरणात शाहूंना जॅक्शनची मदत
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने इंग्रज अधिकारी जॅक्शन हा प्रभावित होता. त्याने छत्रपतींच्या अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच येथील जाती व्यवस्था कमी झाल्याचा निष्कर्ष काढला. विविध व्याख्यानातून तो जनतेमध्ये याची जागृती करत होता. मात्र, त्याची हीच कृती सावरकरप्रणीत अभिनव भारत संघटनेला रुचली नसल्यानेच त्यांनी जॅक्शनचा खून केल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांनी केला.
अखिल भारतीय मराठा महासंघ, शाहू शताब्दी समिती, शाहू सलोखा मंच व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने शाहू स्मारक भवनात आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत बुधवारी (दि.३०) पोखरकर यांनी राजर्षी शाहू, जॅक्सनचा खून व कोल्हापूर संबंध’ या विषयावर शेवटचे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा सरलाताई पाटील होत्या.
पोखरकर यांनी रॅड, जॅक्शन यांच्या हत्या या देशाभिमानातून नव्हे, तर धर्माभिमानातून झाल्याचे दाखलेच दिले. ते म्हणाले, देशात सध्या खोट्या लोकांचे उदात्तीकरण सुरू आहे. खरा इतिहास यांनी दडविला आहे. मात्र, अ.हं साळुंखे, जयसिंगराव पवार यांच्यामुळे तो काही प्रमाणात उजेडात आला. पुण्यात प्लेगची साथ आल्यानंतर रॅड या इंग्रज अधिकाऱ्याने घरोघरी तपासणी सुरू केली. मात्र, रॅडने आमचा धर्म बाटविल्याची आवई चाफेकर बंधूंसहित लोकमान्य टिळक यांनी उठवली. त्यातूनच त्याची हत्या झाली. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा लोकमान्यांचा अग्रलेखही याच घटनेवर होता. तो स्वराज्यासाठी नव्हता. अनंत कान्हेरे यानेही याच धर्माधिष्ठित विचारातून जॅक्शनचा खून केला.
महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित सावंत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. यावेळी हसन देसाई, वैशाली सूर्यवंशी उपस्थित होते. राजू परांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. शैलजा भोसले यांनी आभार मानले.
वेदोक्त प्रकरणात शाहूंना जॅक्शनची मदत
कोल्हापुरातील वेदोक्त प्रकरणावेळी शाहू महाराजांनी जॅक्शनकडे पत्राद्वारे मदत मागताच त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला होता. शाहू महाराजांच्या पुरोगामी कार्याने जॅॅक्शन प्रभावित झाला होता. त्याने शाहू महाराजांना लिहिलेली अनेक पत्रे उपलब्ध असल्याचे पाेखरकर यांनी सांगितले.