Crime News kolhapur: सेंट्रींग ठेकेदाराची वसुलीसाठी कामगाराला मारहाण, मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:33 AM2022-05-19T11:33:38+5:302022-05-19T11:34:39+5:30
भांडण सोडवत असताना मारूती चंपू याने प्रकाश माने यांना जोरदार धक्का मारला, यामध्ये ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हातकणंगले : रुई (ता. हातकणंगले) येथे सेंट्रींग ठेकेदार मारुती सिद्धू चंपू याने ३२ हजार रुपयाच्या वसुलीसाठी कामगार विनोद माने याला मारहाण केली. दोघांचे भांडण सोडवायला गेलेले विनोद माने यांचे वडील प्रकाश लक्ष्मण माने (वय ६६) यांना रस्त्यावर ढकलून दिल्याने त्यांचे डोके रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सेंट्रींग ठेकेदार मारुती चंपू यांच्या विरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
रुई येथील सेंट्रींग ठेकेदार प्रकाश सिद्धू चंपू याने गावातील विनोद माने याला सेंट्रींग कामगार म्हणून कामावर ठेवले होते. त्याला कामापोटी ३२ हजार रुपये ॲडव्हान्स दिला होता. विनोद याला वारंवार कामावर बोलवूनही तो कामावर जात नव्हता म्हणून मारूती त्यांच्या घरी गेला. यावेळी विनोद आणि ठेकेदारामध्ये भांडण सुरू झाले. ठेकेदाराने कामावर ये अन्यथा ३२ हजार रूपये परत दे असे म्हणत विनोदला मारहाण सुरू केली. यावेळी विनोदचे वडील प्रकाश माने भांडण सोडवायला गेले.
भांडण सोडवत असताना मारूती चंपू याने प्रकाश माने यांना जोरदार धक्का मारला, यामध्ये ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मंगळवारी रात्री हातकणंगले पोलिसांना मिळाली. पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ठेकेदार मारूती चंपू याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत उपराटे करत आहेत.
मृतदेह होता पडून....
मंगळवारी दुपारी प्रकाश चंपू आणि कामगार विनोद माने यांच्यामध्ये भांडण झाले. यात प्रकाश माने यांचा मृत्यू झाला होता. मात्र रात्री ९ पर्यंत या प्रकरणामध्ये तडजोडीने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू होते त्यामुळे मृतदेह तसाच पडून होता. अखेर तडजोड झाली नसल्याने मंगळवारी रात्री एक वाजता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.