कोल्हापूर जिल्हा कारागृहातील खुनी, दरोडेखोर आहेत उच्चशिक्षित, तुरुंगातूनच शिकण्याचे अनेकांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:32 PM2023-04-11T15:32:24+5:302023-04-11T15:33:09+5:30

शिक्षण अर्ध्यावर सुटलेले काही कैदी कारागृहातून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

The murderers and robbers of Kolhapur District Jail are highly educated | कोल्हापूर जिल्हा कारागृहातील खुनी, दरोडेखोर आहेत उच्चशिक्षित, तुरुंगातूनच शिकण्याचे अनेकांचे प्रयत्न

कोल्हापूर जिल्हा कारागृहातील खुनी, दरोडेखोर आहेत उच्चशिक्षित, तुरुंगातूनच शिकण्याचे अनेकांचे प्रयत्न

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : गेल्या २५-३० वर्षांपूर्वी कारागृहात बहुतांश कैदी अशिक्षित, अल्पशिक्षित असत. काळाच्या ओघात गुन्ह्यांचे स्वरूप बदलत गेले, तसेच शिक्षित, उच्चशिक्षित कैद्यांचीही संख्या कारागृहांमध्ये वाढू लागली. कळंबा मध्यवर्ती कारागृहात सध्या २१११ कैदी शिक्षा भोगत आहेत. काही कैद्यांचा अपवाद वगळता बहुतांश कैदी शिक्षित आहेत. काही कैदी तर उच्च शिक्षितही आहेत. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्येही शिक्षित कैद्यांचा समावेश होता. शिक्षण अर्ध्यावर सुटलेले काही कैदी कारागृहातून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

क्षमता १६९९, प्रत्यक्ष कैदी २१११

कळंबा कारागृहाची क्षमता १६९९ कैद्यांची आहे. प्रत्यक्षात मात्र या कारागृहात २१११ कैदी आहेत. यात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे यासह उत्तर कर्नाटकातील काही कैद्यांचा समावेश आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे.

महिला कैदी ६०

कारागृहातील एकूण २१११ कैद्यांमध्ये ६० महिला कैद्यांचा समावेश आहे. न्यायालयीन कैद्यांसह शिक्षा लागू झालेल्या महिला कैद्यांचाही यात समावेश आहे. कौटुंबिक वाद, चोरी, आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये महिलांचा समावेश होता. एक परदेशी महिलाही कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे.

शिक्षणात महिला कैद्यांची आघाडी

गुन्हा घडण्यापूर्वी आणि कारागृहात शिक्षा भोगतानाही शिक्षण घेण्याकडे महिला कैद्यांचा कल जास्त आहे. सध्या शिक्षा भोगत असलेल्या सर्व महिला कैदी शिक्षित आहेत. यातील दोन महिला कारागृहात व्यावसायिक प्रमाणपत्र शिक्षण घेत आहेत.

कारागृहात शिक्षणाची सोय

कारागृहात सध्या व्यावसायिक प्रमाणपत्र शिक्षण दिले जाते. पारंपरिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्याही परीक्षा कैद्यांना देता येतात. त्याशिवाय अर्ध्यावर शिक्षण सुटलेल्या कैद्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी कारागृह प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

कोणत्या गुन्ह्यातील किती दोषी?

गुन्हा  -  कैदी
गंभीर गुन्ह्यातील दोषसिद्ध कैदी - ९३०
साध्या शिक्षेतील कैदी - १३८
सक्तमजुरी -   ४७३
मोक्का -  ३६८
स्थानबद्ध - १५
अमली पदार्थ तस्करी - ३६
कैद्यांचे शिक्षण किती?
निरक्षर कैदी : ०२
पाचवीपेक्षा कमी शिकलेले : ९१
पाचवी ते दहावीपर्यंत शिकलेले : १४७८
बारावी पास : ३१०
पदवीधारक : १६४
पदवीपेक्षा जास्त : ६६

शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांच्यात सुधारणा व्हावी, यासाठी कारागृह प्रशासन काम करते. उच्चशिक्षित कैदी पुन्हा गुन्ह्यांच्या वाटेवर जाऊ नयेत, यासाठीही त्यांचे प्रबोधन केले जाते. - पांडुरंग भुसारी, कारागृह अधीक्षक (प्रभारी)

Web Title: The murderers and robbers of Kolhapur District Jail are highly educated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.