Kolhapur Politics: मंडलिक-मुश्रीफ ही नावे वेगळी होऊ शकत नाहीत, हसन मुश्रीफ यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:51 PM2024-04-01T17:51:25+5:302024-04-01T17:51:53+5:30
पाठिंब्यासाठी संजयबाबांना भेटणार
कागल : या लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री म्हणून महायुतीने दिलेली जबाबदारी मला पार पाडायची आहे. कोल्हापूर आणि हातकंणगले मतदारसंघांतील दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासोबतच मला राज्यातही ठिकठिकाणी प्रचारासाठी जावे लागणार आहे. संजय मंडलिक हे तर आपल्या तालुक्यातील उमेदवार आहेत. कागलमधून त्यांना मोठे मताधिक्य देऊ या. पुन्हा एकदा खासदार करून तालुक्याचा मानसन्मान जपूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगळी होऊ शकत नाहीत. राजकारणात कितीही मतभेद आले तरी अंतर्मनात आम्ही एकच आहोत, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, भय्या माने, नविद मुश्रीफ, सतीश पाटील, विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, राजू खाणगावे, चंद्रकांत गवळी, वसंतराव यमगेकर, काशिनाथ तेली, शशिकांत खोत आदी उपस्थित होते.
संजय मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यात विकासाचे राजकारण करण्यासाठी स्पर्धा असते. माझ्या उमेदवारीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक व महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे यांनी स्वागत तर संजय चितारी यांनी आभार मानले.
पाठिंब्यासाठी संजयबाबांना भेटणार
तालुक्याचा खासदार होत असताना सर्व नेतेमंडळींनी एकत्र येण्याची गरज आहे. विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर पालकत्वाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. आपण, मंत्री मुश्रीफ व समरजित विकासासाठी एकत्र आलो आहोत. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनाही मी भेटून मदतीसाठी विनंती करणार आहे, असे मंडलिक म्हणाले. तेव्हा मंत्री मुश्रीफ यांनी मीही त्यांना याबद्दल भेटणार असल्याचा दुजोरा दिला.