आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके 

By संदीप आडनाईक | Published: February 24, 2023 07:21 PM2023-02-24T19:21:54+5:302023-02-24T19:22:25+5:30

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, शाहिदा परवीन यांना डी.लिट. : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शानदार दीक्षांत सोहळा

The need for more long term research in the field of health says senior scientist Dr. Dinkar Salunke | आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके 

आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके 

googlenewsNext

कोल्हापूर : आरोग्य क्षेत्रात आणखी दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनावरही भर दिला पाहिजे. त्यांनी त्याचा उपयोग केवळ समाजासाठी झाला पाहिजे, हे एकच लक्ष्य डोक्यात ठेवले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर साळुंके यांनी केले. येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अकराव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते.

हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन यांना या सोहळ्यात डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी देण्यात आली. ९ विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. एक्सलन्स इन रिसर्च म्हणून डॉ. नवनाथ पडळकर यांना सन्मानित करण्यात आले.

औषधांची तीव्रता काही कालावधीनंतर कमी होत जाते म्हणून औषधांचे संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगून डॉ. साळुंके म्हणाले, पदवी मिळाली हे अर्थार्जनाचे साधन झाले, एवढा मर्यादित विचार न करता त्याला संशोधनाची जोड द्या. त्यात खरे समाजहित आहे. नशीब व जादू कधीच उपयोगी पडत नाही. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास त्यासाठी मेहनतच उपयोगी ठरते, याची खूणगाठ मनाशी बांधा.

लसनिर्मिती क्षेत्रात भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. सिरम आणि भारत बायोटेक्सने उत्पादित केलेल्या लसींची जगभरात निर्यात केली जाते. हा एक विक्रम असून, हे सर्व संशोधनामुळेच शक्य झाले. भारत औषध निर्मितीच्या क्षेत्रात तिसऱ्या स्थानावर आहे. वैद्यकीय सेवा आणि लस निर्मितीच्या क्षेत्रातही देशाने मोठी झेप घेतली आहे, हे सर्व सातत्यपूर्ण संशोधनामुळेच शक्य झाले आहे.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, प्रसार माध्यमे आणि पोलिस यांच्याबद्दल लोक चांगले बोलत नाहीत, अशा परिस्थितीत या दोन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने डी. लिट दिली ही कृतज्ञता आहे. खळबळजनक बातम्या देण्याच्या प्रयत्नात माध्यमांवरचा विश्वास डळमळतो आहे. राजकीय नेते आणि माध्यमातील व्यक्तीपण याला कारणीभूत आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कोल्हापूरने मला खूप दिले. शाहूंच्या विचाराचा आज मी वाहक झालो, तो कोल्हापूरमुळे. त्याबद्दल माझ्या मनात कमालीची कृतज्ञता आहे.

पोलिस उपायुक्त शाहिदा परवीन गांगुली म्हणाल्या, या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मला योग्य समजले गेले, हे मी माझे भाग्य समजते. विविध पदवी घेतलेल्या स्नातकांच्या यशात मी सहभागी झाले. हे सर्वजण भविष्यातील त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतील, त्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी शाहिदा परवीन आणि वसंत भोसले या दोन्ही सन्मानित व्यक्ती खऱ्या रोल मॉडेल असून, समाज अशाच व्यक्तींना पाहून घडत असतो, असे त्यांनी सांगितले.

भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. समारंभास व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, यांच्यासह आक्काताई भोसले, मीना शेषू, जयवंत भोसले उपस्थित होते. डॉ. देवव्रत हर्षे आणि डॉ. निवेदिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नितीन वाधवानी आणि पद्मजा देसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.

सुलभा पन्हाळकर यांचा विशेष सन्मान

डॉ. संजय आणि सतेज पाटील यांच्या शिक्षणाचा प्रारंभ ज्या गणेश विद्यालयातून झाला, त्या विद्यालयाच्या पहिल्या शिक्षिका सुलभा पन्हाळकर यांना शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते या साेहळ्यात सन्मानित करण्यात आले.

Web Title: The need for more long term research in the field of health says senior scientist Dr. Dinkar Salunke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.