कोल्हापूर महापालिकेच्या नूतन आयुक्तांना करावा लागेल आव्हानांचा सामना, रखडलेले प्रकल्प मार्गी लावावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:52 PM2023-08-23T12:52:31+5:302023-08-23T12:52:58+5:30
कोल्हापूर : गेल्या पावणेतीन महिन्यांपासून प्रशासनाची विसकटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासह महापालिकेच्या नूतन आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना अनेक ...
कोल्हापूर : गेल्या पावणेतीन महिन्यांपासून प्रशासनाची विसकटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासह महापालिकेच्या नूतन आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. प्रशासनातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
यापूर्वीच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यानंतर गेल्या ८० दिवसांहून अधिक काळ महापालिकेला आयुक्त तथा प्रशासक नव्हते. त्यामुळे प्रशासनाची सगळी शिस्त बिघडली, अनेक कामे प्रलंबित राहिली. नागरिकांच्या सेवा- सुविधांवर त्याचा परिणाम झाला. कमी- अधिक महत्त्वाच्या अनेक फाइलवर निर्णय रखडले आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणचा कचरा उठाव यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
शहरात दैनंदिन साचणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्नही दिवसे दिवस गंभीर होत आहे. कचरा साठवायचा कोठे, असा प्रश्न आरोग्य विभागाला सतावत आहे. थेट पाइपलाइन योजनेचा एक भाग असलेल्या अमृत योजनेअंतर्गत शहरात टाकल्या जाणाऱ्या जलवाहिनींची कामे रखडली आहेत. बारा जलकुंभांच्या उभारणीची कामेही रखडली आहेत. ती पूर्णत्वाकडे नेणे हेही एक आव्हान आहे.
प्रशासनाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार १५ तारखेपर्यंत करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्राेत निर्माण करण्याचेही एक आव्हान आहे. शहरातील उद्यानांची अवस्थाही अतिशय दयनीय झाली आहे. शहराच्या अनेक भागात रस्ते खराब झाले आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासह नवीन रस्त्यांची कामे दर्जेदार करून घेण्यावर जोर द्यावा लागणार आहे.
महापालिकेचा आकृतीबंद अद्याप मंत्रालय पातळीवर रखडलेला आहे. तो मंजूर झाल्यानंतर नवीन भरती होणे आवश्यक असले तरी नवीन भरती आणि पगारावर होणारा खर्च याची तोंडमिळवणी करता करता नाकीनऊ येणार आहे. अशा असंख्य अडचणीतून मंजुलक्ष्मी यांना काम करावे लागणार आहे.