शिंदे सरकार औटघटकेचे, गद्दार ४० आमदार अपात्र होणार; शिवसेना नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:35 PM2022-07-16T13:35:29+5:302022-07-16T13:37:41+5:30
वर्षभरात लागणाऱ्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे देखील केलं आवाहन
कोल्हापूर : शिवसेनेने सर्व काही दिलेेले असतानाही गद्दारी करून बाहेर पडलेल्या ४० आमदारांना सोबत घेऊन तयार झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवे सरकार औटघटकेचे आहे. आगामी काही दिवसांतच शिवसेना सोडून गेलेले आमदार अपात्र होतील. यामुळे वर्षभरात लागणाऱ्या निवडणुकीसाठी तयार रहा, असे आवाहन शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी येथे केले. भाजपची लाचारी पत्करून मुख्यमंत्रिपद मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांचे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदाराचे राजकारण संपणार आहे, अशीही टीका त्यांनी केली.
शिवसेनेतील राजकीय घडामोडीनंतर आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात मेळावा झाला. संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. त्यांनी ‘शिवसेना अंगार है..बाकी सब भंगार है’ या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
खासदार राऊत म्हणाले, स्वार्थासाठी शिवसेना सोडलेल्यांनी बेशरम राजकारण केले आहे. हे सर्व करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रिपद न देता उपमुख्यमंत्रिपद देऊन चांगला धडा शिकवला. फडणवीस यांच्या तालावर मुख्यमंत्री शिंदे यांना नाचावे लागत आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना जनतेने घरी बसवले आहे. कोकणातील बुटकेश्वर नारायण राणे यांनाही मतदारांनी धडा शिकवला होता. शिवसेनेतून बाहेर पडलेले आता धनुष्यबाणावर दावा करीत आहेत. असे करण्यापेक्षा त्यांनी बापाच्या नावाने पक्ष काढून मते मागावीत.
मेळाव्यास जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, डॉ. सुजीत मिणचेकर, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.
मानेंना ताप, मंडलिक दिल्लीत
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक मेळाव्यास गैरहजर राहिले. माने यांना ताप आणि मंडलिक हे दिल्लीत आहेत. त्यामुळे दोन्ही खासदार मेळाव्यास उपस्थित राहू शकले नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
शिंदेंचे हिंदुत्व बेगडी
ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला नवीन मुख्यमंत्री शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे शिंदे यांचे हिंदुत्व बेगडी आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
सासऱ्यांना आंबोलीतील डोंगार दाखवा की
रविकिरण इंगवले तुमच्या आमदार सासऱ्यांनी गुवाहाटीत जाऊन काय डोंगार, काय झाडी असे म्हटले. त्यांना आंबोलीतील डोंगार आणि झाडी जरा दाखवा, असा सल्ला दूधवडकर यांनी देताच हशा पिकला.
चंद्रकांत पाटील यांना सल्ला
संजय पवार म्हणाले, राजेश क्षीरसागर हे गरज आहे म्हणून आता चंद्रकांत पाटील यांचे पाय धरत आहेत; पण गरज संपताच ते पायही ओढतात. त्यामुळे सावध राहा.
यड्रावकर यांना धडा शिकवतील...
शिवसेनेने राजेंद्र यड्रावकर यांना मंत्री केले; पण त्यांनी पक्षाशी बेइमानी केली. त्यांना धडा शिकवून उल्हास पाटील यांच्या पाठीशी मतदार राहतील, असे खासदार राऊत यांनी सांगितले.