पुनर्विवाहाने 'विधवां'च्या आयुष्यात पुन्हा भरले रंग, कोल्हापुरात पडले पुढचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 01:30 PM2022-02-26T13:30:48+5:302022-02-26T13:31:31+5:30
विधवा पुनर्विवाह हे परंपरांचे जोखड आता कमी होऊ लागल्याचे आणि सामाजिक बदलांचे द्योतक आहे.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : तिचं वय अवघे २५ वर्षे. पदरात लहान मूल... सुखी संसार सुरू असताना कोरोनाने पतीचे निधन झाले. दुसऱ्या घटनेत अपघाताने तिचे कुंकू पुसले. तिसरी घटना सीमेवर शहीद झालेल्या जवानानंतर तिच्या सुखांनाही तिलांजली मिळाली.... पण हे दु:ख आयुष्यभर तिने कवटाळून बसण्यापेक्षा पुनर्विवाहाने विधवेच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे रंग भरले आहेत. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात झालेले विधवा पुनर्विवाह हे परंपरांचे जोखड आता कमी होऊ लागल्याचे आणि सामाजिक बदलांचे द्योतक आहे.
म्हसवे (ता. भुदरगड) येथील स्वाती यांच्या पतीचे कोरोनाने निधन झाल्यावर दिराने बाळासह त्यांचा स्वीकार केला. कोरोना, शहीद जवान, अपघाती मृत्यू अशा कोणत्याही कारणाने वैधव्य आलेल्या तरुणींचे विवाह होण्याचे प्रमाण सुदैवाने आता वाढले आहे. ‘विधवेचे लग्न’ हे शब्द उच्चारणेही जिथे गुन्हा वाटायचा, त्या रूढीबंदिस्त मानसिकतेत सकारात्मक बदल घडून आता पुन्हा एकदा तिची लग्नगाठ बांधली जात आहे.
कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहासाठी तसेच आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या मुलांना अधिकार मिळावेत यासाठी कायदा केला होता. आताच्या पुढारलेल्या समाजमानसात अजूनही विधवा पुनर्विवाहाचा विषय फारसा रुजलेला नाही. त्यात तिला मूल असेल तर आपल्या मुलाचा वारस रहावा म्हणून कुटुंबीयांची देखील विधवेचे लग्न लावून देण्याची तयारी नसते; पण दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने क्षणभंगूर आयुष्य दाखवून दिले.
त्याकाळात विशेषत: दुसऱ्या लाटेत १८ ते ४५ वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कित्येक मुली-महिलांना विवाहानंतर तीन वर्षांच्या आतच वैधव्य आले आहे अशा विधवांच्या विवाहासाठी आता समाज पुढे येत आहे.
मानसिक दडपण
पुनर्विवाहाचा विचार आला तरी विधवा महिलांवर आपण अप्रामाणिकपणा करतोय की काय अशी अपराधी भावना असते. कुटुंबीयांचीदेखील तिचे दुसरे लग्न लावून देण्याची तयारी नसते. ग्रामीण भागात मुलींचे लग्न १८-१९ व्या वर्षीच होते. ती २५ वर्षांपर्यंत एक-दोन बाळांची आई झालेली असते. त्यात मूल मोठे असेल तर पुनर्विवाहाचा विषयच काढला जात नाही.
कौटुंबिक नव्हे, सामाजिक प्रश्न
स्त्रीयांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे समाजात विधवा महिलांची संख्या मोठी आहे. तरीही या विषयाकडे सामाजिक प्रश्न म्हणून नव्हे, तर कौटुंबिक विषय म्हणून पाहिले जाते. अशा स्त्रीने शिक्षण घ्यावे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, तिला पुन्हा पती मिळावा, सुखी संसाराचे सुख मिळावे, हक्काचे कुटुंब मिळावे यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
ही आहे परिस्थिती
शासकीय अहवालानुसार कोरोना मृत्यूपैकी २२ टक्के मृत्यू हे ५० पेक्षा कमी वयोगटातील पुरुषांचे आहेत. राज्यात एकूण दीड लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६० टक्के मृत्यू पुुरुषांचे झाले असे धरले तरी ८० ते ९० हजार पुरुषांचे निधन झाले.
विधवा पुनर्विवाहाचे प्रमाण वाढले असले तरी त्याबाबत खूप काम करावे लागणार आहे. विधवांना पुन्हा संसार सुख मिळावे यासाठी चळवळ सुरू केली आहे. अहमदनगर, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन, यवतमाळ, नाशिकमध्येदेखील असे विवाह झाले आहेत ही समाधानाची बाब आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या किमान १०० महिलांचे पुनर्विवाह व्हावे असे आमचे प्रयत्न आहेत. - हेरंब कुलकर्णी, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र