एनआयएने कोल्हापुरातून ताब्यात घेतलेल्या संशयिताला नेले मुंबईला, यापूर्वीही त्याच्यावर होता गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 05:52 PM2022-09-23T17:52:37+5:302022-09-23T18:08:26+5:30
संशयिताने काही वर्षांपूर्वी आईवडलांपासून दूर म्हणून सिरत मोहल्यातील अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट विकत घेतला.
कोल्हापूर : दहशतवाद्यांशी संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) ने गुरुवारी मध्यरात्रीपासून छापे टाकले. कोल्हापुरातील सुभाषनगर सिरत मोहल्ला परिसरातील ग्राफिक डिझायनर संशयितांस मध्यरात्री झोपेतूनच ताब्यात घेतले. मौला नबीसाब मुल्ला (वय ३८) असे संशयिताचे नाव आहे. या पथकाने त्यास मुंबईला नेले.
पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : दहशतवाद्यांसाठी निधी जमा करणे आणि त्यांच्याशी संपर्क असल्याच्या संशयावरून हे छापे टाकले. सिरत मोहल्ला परिसरात राहणाऱ्या मौला नबीसाब मुल्ला या संशयितास मध्यरात्री तीन वाजता तो राहत असलेल्या अपार्टमेंटमधून ताब्यात घेतले. एक तासाच्या या कारवाईत एन.आय.ए व एटीएसच्या १२ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलिसांनी बंदोबस्त पुरवला व मदत केली.
मुल्ला कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील आहे. संशयिताचे वडील येथे कामानिमित्त आले आणि ते मणेरमळ्यात स्थायिक झाले. संशयिताने काही वर्षांपूर्वी आईवडलांपासून दूर म्हणून सिरत मोहल्यातील अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट विकत घेतला. तेथे तो पत्नी व दोन मुलांसह राहतो.. तो ग्राफिक्स डिझायनचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. त्याने अभियांत्रिकाची डिप्लोमाही केला आहे. पीआयएफ या संघटनेचा पदाधिकारी असल्याचा संशय आहे. त्याच माध्यमातून तो सामाजिक काम करीत होता.
त्याला एन.आय.ए.ने ताब्यात घेतल्याचे शेजारील नागरिकांनाही माहीत नव्हते. पहाटेच ही कारवाई करीत या पथकाने त्याला मुंबईला नेले. कारवाईची माहिती सर्वत्र कळताच पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त तैनात केला.
संशयितावर यापूर्वीही गुन्हा
संशयित मुल्ला यांने डिसेंबर २०२१ मध्ये विक्रमनगर परिसरात धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला फलक लावला होता. या प्रकरणी त्याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायलयाने दर १५ दिवसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजेरी देण्याची अट घातली. त्यानुसार तो हजेरीसाठी या पोलीस ठाण्यात हजर राहत होता. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.