कोल्हापूर विमानतळावरील ‘नाईट लँडिंग’ला दिवाळीचा मुहूर्त

By संताजी मिठारी | Published: July 28, 2022 04:12 PM2022-07-28T16:12:00+5:302022-07-28T16:12:43+5:30

जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापुरात नाइट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एरॉनॉटिकल इन्फाॅर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) या प्रणालीवर विमानतळाला प्रकाशित करावी लागणार

The Night Landing at Kolhapur Airport will start after Diwali | कोल्हापूर विमानतळावरील ‘नाईट लँडिंग’ला दिवाळीचा मुहूर्त

कोल्हापूर विमानतळावरील ‘नाईट लँडिंग’ला दिवाळीचा मुहूर्त

Next

संतोष मिठारी

कोल्हापूर : भारतीय नागरी विमान उड्डयन प्राधिकरणाने नाइट लँडिंग सुविधा आणि विस्तारित धावपट्टीला मंजुरी दिल्याने कोल्हापूरविमानतळ आणि सेवेच्या विस्तारीकरण, विकासातील महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आता त्यापुढे जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापुरात नाइट लँडिंग सुविधेबाबतची माहिती एरॉनॉटिकल इन्फाॅर्मेशन पब्लिकेशन (एआयपी) या प्रणालीवर विमानतळाला प्रकाशित करावी लागणार आहे. त्यासाठी किमान ५६ दिवस लागणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातून विमानांचे दिवाळीत ‘नाइट लँडिंग’ सुरू होणार आहे.

राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेत कोल्हापुरातील विमानतळाच्या धावपट्टीचे १९३० मीटरपर्यंत विस्तारीकरण पूर्ण झाले आहे. पूर्वीच्या १३७० धावपट्टीवर नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याची पाहणी डीजीसीएच्या पथकाने गेल्या महिन्यात केली. त्यानंतर नागरी विमान उड्डयन प्राधिकरणाने मंगळवारी नाइट लँडिंग, विस्तारित धावपट्टीला मंजुरी दिली. ‘एआयपी’कडून विमानतळावरील विविध सुविधांची माहिती प्रकाशित करण्याची प्रक्रिया विमानतळ प्रशासनाने बुधवारपासून सुरू केली आहे.

‘एआयपी’कडून माहिती प्रकाशनाने काय होणार?

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेचे ‘एआयपी’ हे प्रकाशन आहे. हवाई नेव्हिगेशनसाठी वैमानिक आणि विमान कंपन्यांना विमानतळांवरील विविध सुविधांची माहिती असणे आवश्यक असते. ही माहिती एआयपीप्रणाली उपलब्ध करून देते. या प्रणालीवर आता कोल्हापूर विमानतळावरील नाइट लँडिंग सुविधा, धावपट्टी, आदी स्वरूपातील तांत्रिक आणि पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नागरी विमान वाहतूक प्रशासनाकडून त्याची तपासणी होईल. त्यानंतर ती एआयपीवर प्रकाशित होणार आहे. त्यासाठी किमान ५६ दिवस लागणार आहेत. ही माहिती प्रकाशित झाल्यानंतर जगभरातील विमान कंपन्या, वैमानिकांना कोल्हापूर विमानतळाबाबतची आवश्यक ती माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे त्यांना येथून विमानसेवा सुरू करण्यास फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टम अद्ययावत करता येईल.

सुविधांसह विमानतळ सज्ज

विमानतळावरील ॲप्रनची क्षमता वाढल्याने आता तेथे तीन एटीआर, एक एअरबस थांबविण्याची व्यवस्था झाली आहे. विमानाबाबत काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याच्यासाठी आयसोलेशन-वे पूर्ण झाला आहे. कार्गोसेवेसाठी सीसीटीव्ही, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, आदी सुविधांसह विमानतळ सज्ज आहे. बॅले कार्गोसेवा पुरविण्यासाठी काही विमान कंपन्यांकडून ग्राउंड होल्डिंग एजंट नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणापासून कार्गोसेवेची सुरुवात होईल.

या नाइट लँडिंग सुविधेसाठी गेल्या तीन वर्षांपासून विमानतळ प्रशासन आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, उद्योजकांच्या संघटनांचा केंद्र, राज्य सरकार, नागरी विमान उड्डयन प्राधिकरण, केंद्रीय नागरी विमान उड्डयन संचालनालय (डीजीसीए), आदींकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आल्याचा आनंद आहे. एआयपीकडून विमानतळाची माहिती प्रकाशित झाल्यानंतर नाइट लँडिंग प्रत्यक्षात सुरू होईल. - कमल कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ

Web Title: The Night Landing at Kolhapur Airport will start after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.