नियोजन नसणाऱ्यांनी गावाचे प्रतिनिधीत्व केले, आमदार आवाडेंची हाळवणकरांवर टीका; राजकीय निवृत्तीवर म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:55 PM2024-08-26T12:55:05+5:302024-08-26T12:56:47+5:30
'कार्यकर्त्यांनी कुई-कुई करणाऱ्यांच्या नादाला लागू नये'
इचलकरंजी : कोणतेही नियोजन व देणे-घेणे नसलेल्यांनी गावाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाला अडथळा झाला, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता केली. आपण राजकारण व कामातून निवृत्त होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
एका वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आवाडे म्हणाले, शहरात सुमारे पाच हजार अत्याधुनिक यंत्रमाग येत आहेत. त्यासाठी ३० अश्वशक्ती विजेची गरज आहे. मात्र, वीज उपलब्ध नाही. त्यामुळे एलसी उघडणे उद्योजकांनी थांबविले आहे. त्यासाठी नियोजन असणे आवश्यक आहे; परंतु शहराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. कार्यकर्त्यांनी कुई-कुई करणाऱ्यांच्या नादाला लागू नये. त्यांची बुद्धी किती, याचा विचार करावा. गाव पुढे न्यायचे आहे. जे प्रश्न विचारतात, त्यांनी गावासाठी काय केले, हे सांगावे. कृष्णा पाणी योजनेत हेच लोक अडथळा आणत होते आणि आताही आणत आहेत. परंतु आपण चार व्यक्ती पाण्याच्या नियोजनासाठी नेमल्या आहेत.
निवृत्त होणार नाही
आपण राजकारण व कामातून निवृत्त होणार नाही. फक्त टायमिंग गॅप आहे. त्यानंतर कोणत्या निवडणुका लागतात, ते बघून पुढे निर्णय घेतला जाईल, असे आवाडे यांनी सांगितले.