शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याची अधिसूचना निघाली, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 03:33 PM2024-10-24T15:33:07+5:302024-10-24T15:33:28+5:30
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ महामार्ग अखेर रद्द झाल्याचा अध्यादेश निघाला असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दावा ...
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ महामार्ग अखेर रद्द झाल्याचा अध्यादेश निघाला असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दावा केला आहे. कागल येथे आयोजित बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी शक्तिपीठ रद्द झाल्याच्या अधिसूचनेची प्रत माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याकडे सोपवली.
यावेळी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी निरंतर पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांनी पालकमंत्री मुश्रीफ व माजी आमदार घाटगे यांचा कृतज्ञतापर सत्कारही केला. मंत्री मुश्रीफ यांनी ही घोषणा करताच उपस्थित शेतकऱ्यांनी एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. अनेकदा आंदोलनेही केली होती. यामध्ये माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी पुढाकार घेतला होता. हा शक्तिपीठ महामार्ग आज रद्द झाल्याने या सर्वांच्या लढ्याला यश आले आहे. मंत्रिमंडळात पाठपुरावा करून हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करू शकलो, याचा मला विशेष आनंद आहे.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन अनेक शेतकरी भूमिहीन होणार होते. या विरोधात आम्ही सर्वांनी लढा उभारला होता. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे हा महामार्ग रद्द होण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, गोकुळ संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, अंबरीश घाटगे, धनराज घाटगे, बाळासाहेब तुरंबे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.