'छावा' कादंबरी आता इंग्रजीत; शिवाजी सावंत यांच्या कन्येने केला अनुवाद
By संदीप आडनाईक | Updated: March 17, 2025 13:04 IST2025-03-17T13:03:52+5:302025-03-17T13:04:11+5:30
‘छावा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर कादंबरीच्या मागणीत वाढ

'छावा' कादंबरी आता इंग्रजीत; शिवाजी सावंत यांच्या कन्येने केला अनुवाद
संदीप आडनाईक
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची गाथा सांगणारी 'छावा' कादंबरी आता इंग्रजीत वाचकांच्या भेटीसाठी आली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या कादंबरीचा हा अनुवाद या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनी केला आहे.
अभिनेता विकी कौशल याने अभिनय केलेल्या आणि मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा सांगणारा 'छावा' या हिंदी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा सिनेमा आजऱ्याचे सुपुत्र, विख्यात कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या १९७९ साली प्रसिद्ध झालेल्या 'छावा' कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीच्या आतापर्यंत २४ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या कादंबरीला जगभरातील वाचकांकडून मागणी आहे.
‘छावा’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर या साहित्यकृतीची मागणी वाढली. त्यामुळे मेहता पब्लिशिंग हाऊसने 'छावा' नव्याने प्रकाशित केली असून, त्यावर चित्रपटावर आधारित लक्षवेधी मुखपृष्ठ आहे. गेल्या महिन्यात या पुस्तकाच्या २५ हजारांहून अधिक प्रतींची तडाखेबंद विक्री झाली आहे. या कादंबरीने जगभर लक्ष वेधल्याने तिच्या भाषांतरासाठीही मागणी वाढली होती.
इंग्रजी प्रकाशनांकडूनही प्रथमच एखाद्या मराठी कादंबरीसाठी मागणी वाढली होती. त्यामुळे वाचकांच्या मागणीला प्रतिसाद देत मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘छावा' कादंबरीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे. शिवाजी सावंत यांच्या कन्या कादंबिनी धारप यांनीच याचा अनुवाद केला आहे. त्यांनी यापूर्वी ‘युगंधर' या मराठी कादंबरीचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला होता. या निमित्ताने शिवाजी सावंत यांच्या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचीसुद्धा विशेष आवृत्ती प्रकाशित केली आहे.