कोल्हापुरात एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने घटली

By समीर देशपांडे | Published: November 30, 2023 03:58 PM2023-11-30T15:58:03+5:302023-11-30T15:59:36+5:30

कर्मचाऱ्यांची व्यथा कोणी नाही जाणली, आजच्या पुरस्कार वितरणावर बहिष्कार

the number of AIDS patients decreased rapidly In Kolhapur | कोल्हापुरात एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने घटली

कोल्हापुरात एड्सग्रस्तांची संख्या झपाट्याने घटली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एड्सग्रस्तांचा टक्का घटला. पण हा टक्का घटावा, यासाठी परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी मात्र वाढतच आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित पुरस्कारांवरही कर्मचाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे.

दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून जगभर पाळला जातो. जिल्ह्यामध्येही १ डिसेंबर रोजी सीपीआर प्रांगणातून भव्य रॅली काढून पंधरवड्यात विविध उपक्रम होणार आहेत. यावर्षीच्या एड्स दिनाचे ‘आता नेतृत्व समुदायाचे’ हे ब्रीदवाक्य आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर यांच्यावतीने या विभागाचे कामकाज चालते.

सरकारी दवाखान्यांमध्ये आयसीटीसी या केंद्रामध्ये मोफत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी केली जाते. एआरटी केंद्रांमधून एचआयव्ही संसर्गित रुग्णांना दर महिन्याला मोफत औषध पुरवठा व उपचार केले जातात. नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे, हे आशादायक आहे. यासाठी समुपदेशन व चाचणी केंद्र, एआरटी केंद्र, एड्स नियंत्रण पथक रक्तपेढी, डीएसआरसी विभाग, स्वयंसेवी संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे.

एड्सग्रस्तांचे हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत मात्र निराशाजनक चित्र आहे. गेली कित्येक वर्षे हे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर तोकड्या मानधनावर काम करत आहेत. बहुतांशी कर्मचारी ४० ते ५० वयोगटातील आहेत. पण शासनाने या कर्मचाऱ्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. नोकरीची कोणतीही हमी नाही. २०३० पर्यंत नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी एचआयव्ही तपासण्या वाढविणे, वर्षाला किमान १२ संसर्गित रुग्ण आणण्याची सक्ती केली जात आहे. उलट आयसीटीसी केंद्रांची संख्या कमी केली जात असल्याने कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे.

Web Title: the number of AIDS patients decreased rapidly In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.