दस्त नोंदणी वाढली, पण कार्यालये कमी होणार: कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार
By विश्वास पाटील | Published: September 21, 2024 01:38 PM2024-09-21T13:38:15+5:302024-09-21T13:40:37+5:30
स्वइमारतच नाही
विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची संख्या वाढत असल्याचे मान्य करणाऱ्या राज्य सरकारने त्यासाठी नवीन कार्यालये सुरू करण्याऐवजी प्रत्येक कार्यालयाने दस्त नोंदणी करण्याच्या मानक संख्येत शुक्रवारी वाढ केली. शहरी भागातील जिथे ८ हजार वार्षिक दस्त होत होते त्यांनी आता १२ हजार दस्त नोंदणी करावी लागणार आहे. दस्ताची संख्या वाढल्यास काही कार्यालये बंद करावी लागतील अशी भीती कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात किमान ८ हजार दस्तनोंदणीची संख्या शासन आदेशाने निश्चित केली. महसूल व वनविभागाने हा आदेश काढला आहे.
वाढते नागरीकरण तसेच औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यातील विविध दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे राज्य सरकारनेच या आदेशात मान्य केले आहे. कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षाला सरासरी ८ हजारांहून जास्त दस्त नोंदणी झाल्यास त्या कार्यक्षेत्रात नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची आवश्यकता असल्याने नवीन कार्यालयाची निर्मिती व त्यासाठीची आवश्यक पदनिर्मिती करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत राज्याच्या विकासाचे चक्र मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांपुरतेच मर्यादित न राहता सगळीकडेच गतिमान झाले आहे. त्यामुळे दस्त संख्या वाढल्याने नागरिक, लोकप्रतिनिधींकडून नवीन कार्यालये सुरू करण्याची मागणी होत आहे. सरकारने त्या मागणीला फाट्यावर मारून पुन्हा आहे त्याच कार्यालयातील दस्त नोंदणीची संख्या मात्र वाढवली आहे. बहुतांशी कार्यालयात लिपिक संख्या कमी आहे. संगणक ऑपरेटरचे काम खासगी कंपनीकडे दिले आहे.
कोणते व्यवहार वाढले..?
- खरेदी-विक्री
- तारण गहाण खत
- बक्षीस व मृत्युपत्र
- वटमुखत्यारपत्र
- विक्रीचा करार
स्वइमारतच नाही
राज्यातील बहुतांशी दुय्यम निबंधक कार्यालये खासगी जागेत आहेत. तिथे चांगल्या सुविधा नाहीत. एक व्यवहार असला तरी किमान आठ ते दहा लोक कार्यालयात येतात. त्यांना बसायला जागा नसते. एक व्यवहार होण्यासाठी सरासरी तासाचा वेळ लागतो. या सोयीसुविधांकडे लक्ष द्यायला शासन तयार नाही.
- राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये : ५२०
- वर्षाला सरासरी दस्त नोंदणी : प्रत्येकी ८०००
- शहरी व ग्रामीण भागातही प्रत्यक्ष दस्त नोंदणी सोबतच्या ई-रजिस्ट्रेशन प्रणालीवर लिव्ह ॲण्ड लायसन्स व नोटीस इंटिमेशन फायलिंगच्या प्रमाणात वाढ.
- कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालये : एकूण १८
- कोल्हापूर शहर : ०४
- इचलकरंजी,कागल तालुका : प्रत्येकी : ०२
- तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी : ०१
- कोल्हापूर शहरातील चार, शिरोळ व हातकणंगलेमधील प्रत्येकी एक अशा सहा कार्यालयांतच सरासरी ८ हजार दस्त नोंदणी
- इतर कार्यालयांत दस्त नोंदणी कमी.