कोल्हापुरात उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली धक्काबुक्की, तणावाचे वातावरण
By उद्धव गोडसे | Published: November 20, 2024 08:11 PM2024-11-20T20:11:27+5:302024-11-20T20:12:22+5:30
कोल्हापूर : कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उप-शहरप्रमुख राहुल माळी याला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर दोन्ही गटाचे ...
कोल्हापूर : कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उप-शहरप्रमुख राहुल माळी याला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर दोन्ही गटाचे सुमारे एक हजार कार्यकर्ते आमने-सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. आमदार सतेज पाटील यांनी समजूत काढत जमावाला शांत केले.
तसेच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना दुसरीकडे जाण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, टाकाळा, लोणार वसाहत, सदर बाजार येथे झालेल्या किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.
उद्धवसेनेचे राहुल माळी (रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा) यांनी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिल्याचा व्हिडिओ काही व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केला होता. याबाबत बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याला एका तरुणाने फोन करून धमकावले. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास माळी हा भगवा चौकात आला असता, शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या कार्यालयासमोर पोहोचला. त्यावेळी जाधव आणि माळी यांनी एकमेकांना गद्दार, दुगल असे संबोधल्याने वादाला सुरुवात झाली.
आदर्श सुनील जाधव याने माळी याची गळपट पकडून धक्काबुक्की केली. हा प्रकार समजताच कार्यकर्त्यांनी भगवा चौकात धाव घेऊन गर्दी केली. त्याचवेळी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आलेले राजेश क्षीरसागर आणि सत्यजीत कदम हे भगवा चौकातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जमावाने हॉटेलच्या बाहेर गर्दी करताच आमदार सतेज पाटील भगवा चौकात पोहोचले. त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्याशी चर्चा करून क्षीरसागर आणि कदम यांना दुसरीकडे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार टिके यांच्या विनंतीनुसार क्षीरसागर आणि कदम निघून गेले.
त्यानंतर आमदार पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर १० मिनिटे ठिय्या मारला. काही वेळाने कार्यकर्ते निघून गेले. मात्र, या घटनेने सुमारे तासभर कसबा बावडा येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
अनर्थ टळला
दत्त मंदिर कॉर्नर येथील बलभीम विद्यालयाजवळ तरुणांची गर्दी झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून क्षीरसागर आणि कदम हे सुनील जाधव आणि त्यांचा मुलगा आदर्श यांना आपल्या गाडीत घेऊन ते निघून गेले. काही तरुणांनी क्षीरसागर यांच्या गाडीचा पाठलाग केला. कवडे गल्लीच्या कोप-यावर गाडी थांबल्यानंतर जमावाने क्षीरसागर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आमदार सतेज पाटील यांनी भगवा चौकात धाव घेऊन जमावाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे वळविल्याने अनर्थ टळला.
प्रत्येक गोष्टीचा हिशोब करू
मी राहुलच्या पाठीशी भक्कम आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब करू, असे आमदार पाटील यांनी सांगताच तरुणांनी जल्लोष केला. संतप्त जमाव प्रचंड आक्रमक होता. वेळीच त्यांची समजूत घातली नसती तर अनर्थ विपरित घडले असते.