Kolhapur: शिक्षक म्हणतात पुरे झाले 'नाथा', दलालांना आवरा; माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैशाशिवाय होत नाही काम
By पोपट केशव पवार | Published: December 11, 2023 01:47 PM2023-12-11T13:47:34+5:302023-12-11T13:47:58+5:30
विशेष म्हणजे या विभागातील मलिदा पाहून पंटर चाळकेने दुसरीकडील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला असल्याचे समजते.
पोपट पवार
कोल्हापूर : एका टेबलावर ठेवलेली फाइल पुढच्या टेबलावर देण्यापासून ते हक्काची वेतनश्रेणी, पदोन्नती, फरक बिल मिळविण्यापर्यंत बारीकसारीक कामांनाही माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पैसे द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. या कामांसाठी नेमलेली दलालांची साखळी या कार्यालयापर्यंत पोहोचूच देत नाही. यातूनही कोणी पोहोचलाच तर कार्यालयातील कर्मचारीच दलालांचा 'मार्ग' दाखवित असल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक पुरते वैतागले आहेत.
कष्टातून शिकायचे, नोकरीसाठी संस्थाचालकांचे उंबरे झिजवायचे अन् त्यानंतरही पुन्हा हे कार्यालय हक्काच्या वेतनावर डल्ला मारत असल्याने 'पुरे झाले नाथा, दलालांना आवरा आता' अशी म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
स्वच्छ प्रतिमेचा डंका पिटणारे 'नाथ' या दलालांना व कार्यालयातील लिपिकांना का आळा घालत नाहीत, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
धामोड (ता. राधानगरी) येथील एका शिक्षकाला कायमस्वरुपी करताना या कार्यालयाने भलताच त्रास दिला आहे. त्याचा मागील फरक १२ लाख रुपये देण्यात आला. पण, त्यासाठी त्याच्याकडे २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ‘तुला पर्मनंट केले आहे, मग एवढी रक्कम देण्यास काय अडचण आहे? असे बौद्धिकही त्याला दिले. तो याला तयार झाला नसल्याने त्याच्या मूळ ऑर्डरमध्ये त्रुटी काढून त्याचे वेतन थांबवले आहे.
अशा स्वरूपाच्या तक्रारी अनेक शिक्षकांच्या आहेत. ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर तिथे कसे लुबाडणूक होते याचे अनेक किस्से शिक्षकांनी स्वत:हून सांगितले. तुमचे काम झाल्यावर तुम्हाला दरमहा एवढी रक्कम मिळणार आहे मग त्यातील अमुक एवढी रक्कम आम्हाला दिली तर काय बिघडते, असे या लुटीचे स्वरूप असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
घुणकीचा चाळकेच चालवतो विभाग
घुणकी (ता. हातकणंगले) येथील चाळके नावाचा व्यक्ती 'नाथा'चा पंटर आहे. हातकणंगले, शिरोळ, वारणा परिसरातील सर्व फाइल्स तोच त्याच्या घरातून परिपूर्ण करून घेतो. त्याच्याकडे या विभागाचे शिक्केही तयार आहेत. सर्व व्यवहार पूर्ण झाला की केवळ सहीसाठी ही फाइल कार्यालयात जात असते. त्यामुळे या कार्यालयाचे उपकार्यालयच त्याने घुणकीत बनवले असल्याची चर्चा जिल्हाभरातील शिक्षकांमध्ये आहे. विशेष म्हणजे या विभागातील मलिदा पाहून या चाळकेने दुसरीकडील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला असल्याचे समजते.
शिक्षकांवर दबाव
एखाद्या कामासाठी पैसे देण्यास संबंधित शिक्षकाने मनाई केली तर त्या शिक्षकावर कार्यालयातील लिपिकापासून दलालांपर्यंत सगळेच जण दबाव आणतात. अशावेळी संस्थाचालकही त्या शिक्षकाच्या पाठीवरील हात काढून घेतो. त्यामुळे 'पैसे दिले तरच काम होईल' ही पद्धत या साखळीने अधिक मजबूत केली आहे.