कुंभी कारखाना निवडणूक निकाल: पहिल्या फेरीत सत्ताधारी नरके पॅनेलला धक्का, विरोधी आघाडीचे वर्चस्व
By राजाराम लोंढे | Published: February 14, 2023 12:42 PM2023-02-14T12:42:56+5:302023-02-14T12:51:25+5:30
माजी आमदार चंद्रदीप नरके यांची कारखान्यावर १८ वर्षे सत्ता
कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची आज, मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली. पहिल्या फेरीअखेर ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू आघाडीने ४८४ चे मताधिक्य घेतले आहे. यामध्ये गट क्रमांक एक व दोन मधील गावांचा समावेश आहे.
‘कुंभी’साठी रविवारी (दि.१२) चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले होते. माजी आमदार चंद्रदीप नरके यांची कारखान्यावर १८ वर्षे सत्ता आहे. विरोधकांनी एकत्रीत येत नरके यांना आव्हान दिले होते. त्यात आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांच्यासह ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांची साथ विरोधी शाहू आघाडीला मिळाल्याने त्यांची चांगलीच हवा तयार केली हेाती.
सत्तारुढ नरके पॅनेलला आमदार सतेज पाटील यांनी पाठबळ दिले होते. त्यामुळे या निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सकाळी आठ पासून रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत साधारणता ६९०० मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये शाहू आघाडीने ४८४ चे मताधिक्य राहिले. शाहू आघाडीतील शिवाजी तोडकर (वाकरे) हे ३७०० मते घेऊन पहिल्या क्रमांकावर राहिले.