Ambabai (Mahalaxmi) Temple: अंबाबाई मंदिराचे मूळ स्वरूप ४६ वर्षांनी येणार प्रकाशात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:28 AM2022-04-27T11:28:25+5:302022-04-27T11:29:46+5:30
वास्तुकलेचा अजोड नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे मूळ दगडी बांधकाम तब्बल ४६ वर्षांनी प्रकाशात येणार आहे.
कोल्हापूर : वास्तुकलेचा अजोड नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे मूळ दगडी बांधकाम तब्बल ४६ वर्षांनी प्रकाशात येणार आहे. या बांधकामावर लावण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली असून, महिन्याभरात भाविकांना मंदिराचे सौंदर्य पाहता येणार आहे.
अंबाबाई मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम आहे जे अतिशय मजबूत असून, त्यावर सुरेख नक्षीकाम आहे; पण १९७६ च्या सुधारणांच्या काळात संगमरवरी फरशीचे आकर्षण असल्याने भाविकांनी दिलेल्या देणगीतून गाभाऱ्यासह पूर्ण परिसरातील भिंतींना व जमिनीवर या फरशा बसवण्यात आल्या. या फरशीमुळे मूळ दगडांचे झरोखे बंद होऊन उष्णता वाढली. शिवाय दगडाचे मूळ सौंदर्यदेखील झाकोळले गेले.
मात्र, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या मदतीने मंदिर सुधारणा व मुळ स्वरूप उजेडात आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हेरिटेज कमिटीने सुचवल्याप्रमाणे संगमरवरी फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सचिव नाईकवाडे यांच्या हस्ते साहित्यांचे पूजन करून या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर, अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह देवस्थान समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
नगारखाना व मणिकर्णिकेचेही काम
नगारखान्याचे बांधकाम ढासळत असून, पावसाळ्यापूर्वी त्याची पुनर्बांधणी करून संरक्षित करणे गरजेचे आहे. तसेच मणिकर्णिका कुंडाची दत्त मंदिरामागील बाजू धोकादायक झाल्याने येथे भिंत बांधण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहेत.