'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या जयघोषात खोल खंडोबाची पालखी उत्साहात
By संदीप आडनाईक | Published: December 18, 2023 11:13 PM2023-12-18T23:13:08+5:302023-12-18T23:15:44+5:30
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: मार्गशीर्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त शनिवार पेठेतील प्राचीन खोल खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा सोमवारी रात्री पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत 'येळकोट येळकोट जय मल्हार', 'सदानंदाचा येळकोट' असा जयघोष केला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
खोल खंडोबा मंदिरासह शिवाजी पेठेतील खंडोबा मंदिर, रामानंद नगरातील खंडोबा मंदिर आणि अंबाबाई मंदिरातील खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सव पार पडला. हे अतिशय प्राचीन मंदिर जमिनीत २० ते ३० फूट खोल आहे. मंदिरात खाली जाण्यासाठी ओबडधोबड दगडी पायऱ्या आहेत. मंदिराच्या भोवती मुस्लिम स्थापत्य शैलीनुसार घुमट आहे. घुमटावर कळस आणि कमळाच्या पाकळ्या आहेत.
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई केली आहे, तसेच के. के. बॉइज ग्रुप, मृत्युंजय मित्र मंडळ , हनुमान सेवा मंडळ आणि साई मित्र मंडळांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत. खोल खंडोबा देवस्थान ट्रस्टतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गेल्या पाच दिवसांपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. उत्सवाची सांगता सोमवारी रात्री पालखी सोहळ्याने झाली. रात्री पावणे आठच्या सुमारास मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आरती व पालखीला सुरुवात झाली.मंदिराभोवती पाच फेऱ्या काढण्यात आल्या.