कोल्हापुरात चिमुरड्याला सोडून पालक गायब, बाल कल्याण संकुलात केलं दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:30 IST2025-03-03T15:29:31+5:302025-03-03T15:30:43+5:30
कोल्हापूर : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला भवानी मंडपात सोडून पालकांनी पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. २) सकाळी घडला ...

कोल्हापुरात चिमुरड्याला सोडून पालक गायब, बाल कल्याण संकुलात केलं दाखल
कोल्हापूर : अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला भवानी मंडपात सोडून पालकांनी पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. २) सकाळी घडला आहे. रडणाऱ्या मुलाला पाहून परिसरात खेळणी विकणाऱ्या विक्रेत्यांनी त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पालकांचा शोध सुरू असून, मुलाला बाल कल्याण संकुलात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सापडलेला मुलगा स्वत:चे नाव आरुष सचिन चौगुले असे सांगत आहे. त्याचा पत्ता पलूस (जि. सांगली) असा असल्याचे त्याने सांगितले. तो घाबरला असल्याने त्याचे नाव आणि पत्ता याबद्दल स्पष्टता नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी काही वेळ त्याचे नातेवाईक येण्याची वाट पाहिली. कोणीच येत नसल्याने अखेर त्याला खायला देऊन बाल कल्याण संकुलात दाखल केले. अंदाजे तीन वर्षीय मुलगा हरवला असल्यास संबंधित नातेवाइकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जुना राजवाडा पोलिसांनी केले आहे.