चंद्रयान-३ मोहिमेत मराठी शास्त्रज्ञाचा डंका, सीमाभागातील केरबा लोहार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
By संदीप आडनाईक | Published: July 15, 2023 11:44 AM2023-07-15T11:44:21+5:302023-07-15T11:52:15+5:30
घरची परिस्थिती हलाखीची; जिद्द, चिकाटी अन् मेहनतीमुळे इस्रोत, केरबा लोहार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
संदीप आडनाईक
कोल्हापूर : घरची हलाखीची परिस्थिती असतानाही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) वरिष्ठ शास्त्रज्ञ पदावर असणाऱ्या आडी (ता. निपाणी) या सीमाभागातील गावचे केरबा आनंदराव लोहार या मराठी तरुणाचा चंद्रयान-३ मोहिमेला हातभार लागला आहे. त्यांच्यावर सीमाभागासोबत संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सीमाभागातील आडी हे केरबा लोहार यांचे मूळ गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण आडी येथील सरकारी शाळेत आणि माध्यमिक शिक्षण सौंदलगा येथे झाले. बेळगावच्या शासकीय पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला. याचवेळी इस्रोच्या मुख्य कार्यालयातील तांत्रिक सल्लागार या पदासाठी त्यांनी परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर ते १९९४ पासून या पदावर रुजू झाले.
परंतु अवकाश संशोधनाची आवड निर्माण झालेल्या केरबा यांनी बंगळुरू येथील बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एमईचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीत असूनही शिक्षणाची तसेच कामावरची श्रद्धा आणि मेहनत पाहून त्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून पदोन्नती मिळत गेली. यापूर्वी २०१९ मध्ये चंद्रयान-२ या मोहिमेतही त्यांच्या कामाची प्रशंसा झाली. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले होते. यापूर्वीही त्यांनी चंद्रयान-१, मंगळयान, जीएसएलव्ही यासारख्या विविध मोहिमांसाठी काम केले आहे.
ऑर्बिटर सेन्सर डिझाईनमध्ये सिंहाचा वाटा
चंद्रयान मोहिमेतील उपग्रहामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांची मुख्य भूमिका असते. या तिन्ही भागांसाठी लागणारे डिझाईन करणाऱ्या टीममध्ये केरबा लोहार यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१९ मधील चंद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क सुरळीत ठेवण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी आटोकाट प्रयत्न केले, त्यामध्ये केरबा लोहार यांचाही सहभाग होता. दुर्दैवाने हा लँडरचा संपर्क न झाल्याने दुसरी मोहीम अयशस्वी झाली.
अवकाश संशोधनामध्ये संधी
या मोहिमेच्या यशामुळे भारताकडे इतर देश आदराने पाहत आहेत. कठोर परिश्रम आणि सातत्य यामुळे २०१९ मध्ये आलेले अपयश मागे सारून यशाची झेप घेतल्याचा मोठा आनंद आहे. तरुणांना अवकाश संशोधनात मोठी संधी आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिक तसेच संगणकशास्त्र या विषयाच्या विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात यावे. - केरबा लोहार,