लग्नाच्या याद्यांवर प्रथमच महिलांच्या सह्या, कोल्हापुरातील 'या' गावातील पाटील कुटुंबीयांनी टाकले नवे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:08 IST2025-03-07T16:06:32+5:302025-03-07T16:08:07+5:30

सामाजिक विचारांचा जपला वारसा

The Patil family of Chipri in Shirol taluka kolhapur signed the marriage records for the first time with women | लग्नाच्या याद्यांवर प्रथमच महिलांच्या सह्या, कोल्हापुरातील 'या' गावातील पाटील कुटुंबीयांनी टाकले नवे पाऊल

लग्नाच्या याद्यांवर प्रथमच महिलांच्या सह्या, कोल्हापुरातील 'या' गावातील पाटील कुटुंबीयांनी टाकले नवे पाऊल

संदीप बावचे

जयसिंगपूर : लग्न ठरविताना सुरुवातीला याद्या लिहिल्या जातात. त्या दोन्ही बाजूच्या बुजुर्ग पुरुष मंडळींकडूनच लिहून एकमेकांकडे घेतल्या जातात. मात्र, शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील पाटील कुटुंबीयांनी नवे पाऊल टाकले आहे. निखिल पाटील व प्रीतल चौगुले यांच्या लग्नाच्या याद्या महिलांच्या सहीनेच झाल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाटील व चौगुले कुटुंबीयांनी महिलांचा सन्मान राखत सामाजिकतेचा संदेश दिला आहे.

महिलांचा सन्मान राखण्यासाठी चिपरी येथील पाटील व इचलकरंजी येथील चौगुले परिवाराने लग्नाच्या याद्या महिलांच्या स्वाक्षरीने पूर्ण केल्या. लग्नाच्या याद्या पुरुषच लिहितात ही आजपर्यंतची परंपरा आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान राखता यावा यासाठी एक सामाजिक संदेश देण्यासाठी चिपरी येथील कुमार पाटील व इचलकरंजी येथील सुनील चौगुले या कुटुंबीयांनी एकत्रित निर्णय घेऊन महिलांच्या हस्ते लग्नाच्या याद्या लिहिल्या. या यादीवर दोन्ही कुटुंबातील महिलांची नावे व स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. 

या दोन्ही कुटुंबीयांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम यानिमित्ताने केले आहे. कुमार पाटील यांच्या सुनबाई शर्वरी पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. याद्यांवर कस्तुरी पाटील, उमा खोत, सुनीता पाटील, सोनाली आवटी, अनिता पाटील, शोभा चौगुले, सारिका टारे, पायल मोकाशी, सुजाता कल्याणी, प्रभावती चौगुले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सामाजिक विचारांचा जपला वारसा

मुलगा निखिल याचे पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झाले असून, पर्यावरण विभाग दिल्ली येथे नोकरीस आहे, तर मुलगी प्रीतल ही प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सासर, माहेरील मंडळींकडे सामाजिक विचारांचा वारसा आहे. कुटुंबातून मुलींनाही स्वातंत्र्य आहे. त्यातूनच ही कल्पना पुढे आली. दोन्ही कुटुंबीयांनी महिलांच्या हस्तेच याद्या लिहिण्यास संमती दिली, अशी माहिती शर्वरी पाटील यांनी दिली.

निर्णयाचे स्वागत

लग्न ठरविताना सर्व निर्णय पुरुष घेतात. लग्नाची बोलणी व निर्णयदेखील तेच घेतात. मात्र, पाटील व चौगुले कुटुंबातील महिलांनी हुंड्याला फाटा देऊन हे लग्न ठरविले. शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेऊन ऐतिहासिक पाऊल टाकले होते. त्यानंतर आता लग्नाच्या याद्या लिहून महिलांनी आणखी एक नवे पाऊल टाकले आहे.

Web Title: The Patil family of Chipri in Shirol taluka kolhapur signed the marriage records for the first time with women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.