पक्षाशी झाले गद्दार, कोल्हापूरकरांनी 'या' नेत्यांना केले हद्दपार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 18:36 IST2024-11-04T18:34:42+5:302024-11-04T18:36:45+5:30
पोपट पवार कोल्हापूर : ‘एक पक्ष, एक झेंडा अन् एकच विचार’ घेऊन निष्ठेच्या पखाली वाहणारे नेते बदलत्या राजकारणात दुर्मीळ ...

पक्षाशी झाले गद्दार, कोल्हापूरकरांनी 'या' नेत्यांना केले हद्दपार
पोपट पवार
कोल्हापूर : ‘एक पक्ष, एक झेंडा अन् एकच विचार’ घेऊन निष्ठेच्या पखाली वाहणारे नेते बदलत्या राजकारणात दुर्मीळ होत असताना एका रात्रीत पक्ष बदलून निष्ठा खुंटीवर टांगणाऱ्यांची मात्र सध्या भलतीच चलती आहे. झाडून सर्वच पक्षांतील आयाराम-गयारामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात १९८०-८५ पर्यंत एकाच पक्षात राहून पक्षनिष्ठा वाहणारे असंख्य होते. मात्र, पुढे बदलत्या राजकारणात अनेकांनी सोयीच्या भूमिका घेतल्या. नेत्यांची ही भूमिका जनतेने मात्र स्वीकारली नसल्याचे त्यांच्या निवडणुकांमधील निकालावरून दिसते.
देसाई यांनी पक्ष बदलला अन् पराभव झाला
पूर्वी कोल्हापूर शहरामध्ये शिवसेनेचा दबदबा होता. याच काळात १९९० मध्ये कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेकडून दिलीप देसाई हे विजयी झाले होते. मात्र, तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी पक्षात बंड करून काँग्रेसची वाट धरल्याने देसाई यांनीही भुजबळ यांना साथ देत शिवसेना सोडली. पुढे १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत देसाई यांचे हे पक्षांतर जनतेला रुचले नाही. त्यांनी सुरेश साळोखे या शिवसैनिकाला विधानसभेत पाठवत देसाई यांना घरी बसवले.
बाबासाहेब पाटील यांचाही पराभव
शाहूवाडी मतदारसंघातून बाबासाहेब पाटील-सरुडकर हे १९९० मध्ये शिवसेनेकडून विधानसभेत गेले होते. तेही भुजबळ यांच्या बंडात सहभागी झाले. पुढे १९९५ च्या निवडणुकीत येथील जनतेने अपक्ष रिंगणात उतरलेल्या संजयसिंह गायकवाड यांना गुलाल लावत सरुडकर यांचे पक्षांतर मान्य नसल्याचा संदेश दिला.
उमेदवार नव्हे, पक्ष बलवान, कारखानीस यांनी घेतला धडा
कोल्हापूर शहरातून तीनवेळा व शाहूवाडीतून एकवेळा शेकापकडून आमदार राहिलेले त्र्यंबक सीताराम कारखानीस हे त्या काळातील जिल्ह्यातील बडे प्रस्थ. १९८५ च्या निवडणुकीत कारखानीस यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत काँग्रेसची वाट धरली. मात्र, तेथेही त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष रिंगणात उतरले. पण, जनतेने त्यांचा अभूतपूर्व मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शेकापकडून एन. डी. पाटील यांनी विजय मिळविला होता.