कोल्हापूरकरांनी दोन दिवसांत ७४ लाखांचा आंबा केला फस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 04:14 PM2024-04-10T16:14:57+5:302024-04-10T16:15:10+5:30
यंदा आवक चांगली असली तरी उठावही अधिक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत कोकण हापूस, लालबाग व मद्रास हापूस आंब्याची विक्री माेठ्या प्रमाणात झाली. तब्बल १७ हजार ८६९ बाॅक्स आणि ५०० हून अधिक पेट्यांची विक्री झाली असून कोल्हापूरकरांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ७४ लाखांचा आंबा फस्त केला आहे. यंदा आवक चांगली असली तरी उठावही अधिक आहे.
यंदा हापूस आंब्याची आवक लवकर झाली आहे. साधारणत: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खरेदी केली जाते. त्यामुळे साेमवारी व मंगळवारी दिवसभर बाजार समितीसह शहरातील फळ मार्केट व प्रमुख रस्त्यांच्या कडेला हापूस आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. सध्या कोकणातून हापूस आंब्याची आवक होत आहे. पाडव्याला मागणी अधिक असल्याने बाजारात शेतकऱ्यांकडून आवकही मोठ्या प्रमाणात झाली होती. दोन दिवसात १७ हजार ८६९ बॉक्स व ५०० पेट्यांची विक्री झाली. बॉक्सचा सरासरी दर ३५० रुपये तर पेटीचा २५०० रुपये दर आहे. दर तेजीत असले तरी खरेदीही चांगली झाली.
परराज्यातील आंब्याची आवक कधी?
कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरातमधून आंब्याची आवक झालेली नाही. त्यामुळे बाजारात दर काहीसे तेजीत आहेत. येत्या आठवड्यात आंब्याची आवक वाढणार असल्याने दर कमी होईल.
बाजार समितीत हापूस आंब्याची विक्री
वार विक्री सरासरी दर
सोमवार - १० हजार ९१ - ४००
मंगळवार - ६ हजार ३५३ - ३५०
गुढी पाडव्यामुळे हापूस आंब्याची उलाढाल वाढली. अद्याप परराज्यातील आवक होत नाही, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात कोल्हापुरात हापूस आंब्याची रेलचेल पाहावयास मिळेल. सामान्य माणसांच्या घरात आंबा पोहोचेल. - नंदकुमार वळंजू (आंबा व्यापारी)