शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानप्रश्नी 'स्वाभिमानी' आक्रमक; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 12:13 PM2023-06-10T12:13:04+5:302023-06-10T12:19:28+5:30
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्या
जयसिंगपूर : ऊसदर नियंत्रण समितीच्या स्थापनेसह शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी जनता दरबारातच मुख्यमंत्र्यांना जाब विचारतील, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन देण्यात आले.
यावेळी शेट्टी म्हणाले, राज्य सरकारने ऊसदर नियंत्रण समिती न नेमल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. राज्य सरकारला आम्ही गेल्या वर्षभरापासून यासंदर्भात वेळोवेळी ऊसदर नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी मागणी केलेली आहे.
ऊसदर समिती स्थापन न झाल्यामुळे राज्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये साखर कारखानदार बिनव्याजी वापरत आहेत. तसेच राज्य सरकारने गेल्या १४ महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्यापही दिलेली नाही.
याबाबत मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी मागणी केली आहे. तातडीने प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणेबाबत आदेश व्हावेत, हीदेखील आमची आग्रही मागणी असल्याचे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, जनार्दन पाटील, सागर संभूशेटे उपस्थित होते.
आमच्या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास ११ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही जाब विचारू. शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केले आहे. याबाबत शासनाने तातडीने खुलासा करावा. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याअगोदर प्रश्न मिटला नाहीतर स्वाभिमानी स्टाइलने आंदोलन करू. - राजू शेट्टी, माजी खासदार