फोन आला; मी जीवनाला कंटाळलोय, आत्महत्या करतोय! अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:48 PM2022-06-30T18:48:03+5:302022-06-30T18:51:53+5:30
तोपर्यत फोन करणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने विषाची बाटली पिऊन रिकामी केली होती.
कोल्हापूर : मी जीवनाला कंटाळलोय, विष पिऊन आत्महत्या करतोय, असा फोन महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आला, अन जवानांची पळापळ झाली, साळोखेनगरात एका वर्दीवरील फायरफायटर तातडीने जीवबा नाना पार्कमध्ये तातडीने पाठवला. तोपर्यत फोन करणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने विषाची बाटली पिऊन रिकामी केली होती. त्याला तातडीने सीपीआर रुग़्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
जीवबा नाना जाधव पार्कमधून दुपारी ४.५० वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात फोन आला, ‘मी विष पिऊन आत्महत्या करतोय’ असे सांगून संबधीत व्यक्तीने फोन बंद केला. फोन ऑपरेटर सुदेश पाटील यांनी, तत्परता दाखवत साळोखेनगर येथे एका वर्दीवर अग्निशमन दलाच्या गाडीवरील संदीप व्हनाळकर यांना फोन करुन माहिती दिली. व्हनाळकर, बाबूराव सनगर, सौरभ पाटील हे तातडीने जीवबा नाना पार्कमध्ये गेले. संबधीताचा फोन बंद असतानाही काही मिनीटातच त्याला शोधले.
दरम्यान, संबधीत व्यक्तीने तळमजल्यातच विष प्राशन करुन शेजारी रिकामी बाटली ठेवली होती, त्याचे कुटुंब पहिल्या मजल्यावर असल्याने त्यांना घटनेची कल्पनाच नव्हती. अग्नीशमनची गाडी सायरन वाजवत दारात उभारल्यानंतर घटना कुटुंबांच्या लक्षात आली. जवानांनी तातडीने त्याला गाडीत घेऊन सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याने कौटुंबिक कारणांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. पण अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले.