अभिजात संगीताचे स्थान मनोरंजनाच्या पलीकडचे - गायक महेश काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 02:52 PM2022-05-13T14:52:36+5:302022-05-13T14:53:53+5:30
कोल्हापूर : अभिजात संगीताचा वारसा जपण्याचा माझा प्रयत्न आहे. नाट्यसंगीत, अभंग, हिंदी भजनं जरी गात असलो तरी शास्त्रीय संगीताला ...
कोल्हापूर : अभिजात संगीताचा वारसा जपण्याचा माझा प्रयत्न आहे. नाट्यसंगीत, अभंग, हिंदी भजनं जरी गात असलो तरी शास्त्रीय संगीताला पुढे नेण्याचा वारसा जपलेला आहे. अभिजात संगीताचे स्थान मनोरंजनाच्या पलीकडचे आहे. आपल्या प्रत्येकामध्ये या संगीताचे स्थान अढळ आहे, असे मत गायक महेश काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
मार्केट यार्ड येथे शाहू सांस्कृतिक सभागृहात आज सायंकाळी होणाऱ्या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संगीत नाटकेच लिहिली जात नाहीत तिथे नांदी कोण गाणार, असा सवाल करून त्यांनी कोणी लिहिणारे असतील तर मी आनंदाने चाल लावेन, असे सांगितले.
अभिजात संगीताला व्यापक करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदतच होते. अमेरिकेतील एका न्यूरो सायंटिस्टसोबत मी एक प्रयोग करत आहे. इलेक्ट्रोडचे हेल्मेट लावलेल्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत ऐकवल्याचे काय परिणाम होतात हे पाहिले असता शांतता, झोप, विचारशक्ती आणि स्मरणशक्ती वाढल्याचे आढळून आले. गाणाऱ्यांचे स्वास्थ्य, आचरण, संयम कल्पनातीत राहते, असे मत महेश काळे यांनी यावेळी व्यक्त केले.
माझ्या मैफलीत मी नेहमी शास्त्रीय संगीत गाण्याचा आग्रह धरतो. रसिकांनीही त्याची फर्माईश केली पाहिजे, असे सांगून काळे म्हणाले, कोरोना महामारीने जगभरातील संगीत क्षेत्रातील विद्यार्थी माझ्याशी जोडले गेले. ज्या-ज्या ठिकाणी जातो, त्या-त्या ठिकाणी कार्यशाळा घेतो. सुपीक बियाणे आणि सकस जमीन असली तरी श्रद्धेची मशागत केल्याशिवाय फळ मिळत नाही. त्यामुळे बीज अंकुरले आहे आता फळ मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेतून मास्टर दीनानाथ, बालगंधर्व यांच्यापासून माझे गुरू जितेंद्र अभिषेकी यांच्यापर्यंत अनेकांचा वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. सहा सेकंदांत रील करणाऱ्या पिढीला घडविण्याचा संयम ठेवला पाहिजे. आज सारेगमही माहित नसलेले बंदिशी गात आहेत, हे त्याचे यश आहे, असे ते म्हणाले.
कोल्हापूरच्या प्रल्हाद जाधवचे कौतुक
कोल्हापुरातील संगीत विद्यार्थ्यांशी मी आवर्जून संवाद साधणार आहे, असे सांगून महेश काळे यांनी कोल्हापूरच्या प्रल्हाद जाधव याचे कौतुक केले. ते म्हणाले, संगीत शिकण्याची तळमळ, प्रामाणिकणपणा यामुळेसूर नवा, ध्यास नवा कार्यक्रमाच्या पहिल्या शोपासून तो माझ्या प्रत्येक मैफलीत आहे. सारेगम आणि सूर नवा, ध्यास नवा यासारख्या कार्यक्रमांनी नव्या पिढीतील संगीतातील प्रतिभा समोर आली, असेही ते म्हणाले.