कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत येथील प्रार्थनास्थळ मुस्लिम समाजाने स्वत:हून उतरविले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 12:31 PM2023-12-30T12:31:59+5:302023-12-30T12:32:17+5:30

अनधिकृत मदरशावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या

The place of worship at Lakshatirtha Vasahat in Kolhapur was taken down by the Muslim community | कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत येथील प्रार्थनास्थळ मुस्लिम समाजाने स्वत:हून उतरविले

कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत येथील प्रार्थनास्थळ मुस्लिम समाजाने स्वत:हून उतरविले

कोल्हापूर : कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीच्या गुंजोटे कॉलनी परिसरातील अनधिकृत प्रार्थनास्थळ मुस्लिम समाजाने शुक्रवारी स्वत:हून काढून घेत सामंजस्याचा धडा घालून दिला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला सहकार्य करत कारवाई करण्यापूर्वीच समजुतीची भूमिका घेत मुस्लिम समाजाने या मदरशामधील साहित्य आणि पत्र्याचे शेड स्वत:हून काढून घेतले.

लक्षतीर्थ वसाहतीमधील या अनधिकृत मदरशावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत मदरशाचा, तसेच अलिफा अंजुमन मदरशाविरोधात तक्रार दिली होती.

महापालिकेच्या नगररचना विभागाने पोलिस फौजफाट्यासह पाहणी करून केवळ कुलूप लावून परत आल्याने हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या होत्या. त्यांनी महापालिकेत आंदोलन करत हे प्रार्थनास्थळ हटविण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देत घेराव घालण्याचा इशारा दिला. त्यानंतर गुरुवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त होता, तसेच गस्तीपथक नेमले होते. 

अलिफा अंजुमन मदरसा आणि सुन्नत जमात न्याय संस्थेने त्यांचे मदरसे यापूर्वीच बंद केले असल्याचे लेखी दिले आहे. दरम्यान, लक्षतीर्थ वसाहतीतील मुस्लिम समाजाने शुक्रवारी बैठक घेत हे प्रार्थनास्थळाचे बांधकाम स्वत:हून उतरवण्याचा सामंजस्याने निर्णय घेतला. सायंकाळी मुस्लिम समाजाने या प्रार्थनास्थळावरील पत्र्याचे शेड आणि इतर साहित्य काढून घेतले. दरम्यान, ही जागा आपल्या मालकीची असून, ती धार्मिक कामासाठी वापरली जात होती. 

मात्र, समाजात तेढ निर्माण होऊ नये, म्हणून तसेच महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाने बांधकाम व इतर साहित्य स्वखुशीने काढून घेतल्याचे जागामालक लिलीभाई ऊर्फ हाजी लियाकत गोलंदाज यांनी सांगितले. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहनही गोलंदाज यांनी केले. मुस्लिम समाजाच्या तरुणाने स्वत:हून हे बांधकाम काढून घेतल्याने पुढील वाद आणि महापालिकेची कारवाई टळली आहे.

Web Title: The place of worship at Lakshatirtha Vasahat in Kolhapur was taken down by the Muslim community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.